पान:मी भरून पावले आहे.pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाकिस्तानात म्हणजे कराचीत- मेन कराचीत आम्ही गेलो होतो. जेव्हा निघालो तेव्हा आतेभावाने मला काय सांगितलं की तू अजून आईकडे गेलेली नाहीस. तर तू त्यांचा अजून राग मानू नको. मी सगळी मदत करणार आहे तर तू आईकडे जा. आणि त्यानं परस्पर माझ्या आईला दमाबिमाचं जरा पत्र लिहिलं आणि सांगितलं की ती तुमच्याकडे अशी अशी येणार आहे. तेव्हा तुम्ही तिला बाजूला करू नका. मी समजूत घातलेली आहे. तुम्हांला मदत करायला पाहिजे. आणि मग मी आईकडे यांना घेऊन गेले आणि आमचं नातं सरळ झालं. ते झाल्यानंतर पहिल्यांदा आई माझ्या घरी आली. त्या खोलीत आली. ती तिला आवडली नाही. पैशाचा मोह तिला जरा जास्तच होता. म्हणजे बोलतानाही, "टी.व्ही. ना, चारदा बदललाय, कपाट ना सतरादा बदललंय, मला हे आवडत नाही म्हणून असं सगळं बदलत असते", असं बोलणं. त्याच्यानंतर तिने आपल्याजवळ एक खोली आम्हांला बघून दिली. ती हिंदमाता सिनेमाच्या कॉर्नरवर होती. त्या खोलीत एक म्हातारी राहात होती. पण ती म्हातारी धंदा करत होती बायकांचा. हे आमच्या आईला इनडायरेक्टली माहिती होतं. माहिती नव्हतं असं नाही. तिच्याकडे एक मुलगी रहात असे. खोली मोठी होती. आम्ही राह्यलो. ती म्हातारी कुणाकडे तरी काम करायची आणि ज्या मुलीला तिनं राहायला दिलं होतं ती मुलगी तिथं धंदा चालवायची. हे आम्हांला माहिती नव्हतं. तिथं आम्ही सामानबिमान सगळं घेऊन गेलो. नणंद, दीर सगळे जण आम्ही पहिली खोली सोडून गेलो. तिकडे आम्ही राह्यलो रात्रीचं, तर तमाशा. ती बाई दार उघडून कुणाकुणाला घ्यायची आत. बरं नंतर आम्ही पडदा लावायला लागलो आमच्या पलंगाला तर पलंगाचा पडदा ओढून टाकायची ती. त्या वातावरणामध्ये माझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं झालं. दोन-चार महिने गेलेले मला. आणि त्यामध्ये, रोजच्या भांडणामध्ये झोपायला जागा नाही आणि समोरच सगळं चालल्यावर मी यांच्या बाजूला कशी झोपणार? थोडीशी गॅलरी होती त्या गॅलरीत मी झोपायची. माझ्या देखत धंदा चालायचा. रात्रीची वेळ होती. पलंग ठेवलेला तिथं धंदा चालू आहे. इथं दुसरा पलंग आणि आम्ही झोपलेलो. आणि माझी नणंद दीर पण बरोबर. ते खाली झोपलेले आणि ह्यांचा धंदा चालायचा. ते बघितल्यानंतर चिडचिड व्हायला लागली. पण जाणार कुठे आम्ही? जायला जागा नाही, मग काय करायचं? आईला सांगितलं. तिला सगळं माहिती होतं. तिनं फार लाईटली घेतलं. तिला वाटलं की त्या खोलीपेक्षा ही खोली जास्त मोठी आहे.

मी भरून पावले आहे : ४३