हे म्हणाले, काय झालं. मी म्हटलं, उगाच आलो आपण पाकिस्तानात. आलो नसतो तर बरं झालं असतं. ही काय किटकिट. तेव्हा ते म्हणाले, जाऊ दे ग, त्यांचं ते काम असतं. आपल्याला काय करायचं? तू असं बोललीस ना, तिला खरं वाटलं ना? झालं तर मग! त्या वेळी आमच्याकडे पानं होती. कराचीला पानं मिळायची नाहीत म्हणून मी खायला पानं घेऊन गेले होते. एक सरदारजी भेटला अमृतसरला. तो म्हणाला की, “ये पान इतने क्यू ले जा रहे हो?" आम्ही म्हटलं, "हम क्या दूसरा बाँट सकते हैं लोगों को? हमारे जो रिश्तेदार है, वो पान खानेवाले है। वहाँ पे पान नही मिलता इसलिए ले जा रहे हैं। क्या बात है सरदारजी, आप भी थोडेसे रख ले।" त्याला थोडी पानं दिली आणि आम्ही पुढे गेलो रेल्वेने. आणि येताना आम्ही मग बोटीने आलो.
पाकिस्तानात आम्ही राह्यलो महिना दीड-महिना. राहिलो, फिरलो. त्या काळातही वातावरण तितकसं बरोबर वाटलं नाही. हिंदुस्थानामध्ये राहाणाऱ्या लोकांना तिथे चांगलं वाटेल असं नाही. मला वाटलं नाही. मला एंजॉय करून आणखी दोन महिने काढावेत असं वाटलं नाही. माझे ढीगभर नातेवाईक होते. सगळ्यांनी आम्हांला पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्या काळात माझी आई नव्हती तिथे. मोठा भाऊ होता. कस्टममध्ये आतेभाऊ होता. त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याच्याकडे राहिलो आम्ही. त्यांनी फिरा-बिरायची व्यवस्था आमची केली. आतेभावानं मग यांच्या डोक्यात भरवलं की तुम्हांला जर मी इथंच बोलावलं, धंदा करायला लावलं आणि इथून बाहेर पाठवलं, लंडनला पाठवलं, अमेरिकेला पाठवलं, तर धंदा कराल का? तर म्हणाले, मी प्रयत्न करीन. असं डोक्यात घेऊन आम्ही परत फिरलो. ह्यांनी ह्यांच्या कामाच्या दृष्टीनं माणसांची ओळख-बिळख काढली. मंडळ त्यांनी त्या वेळी काढलं नव्हतं, पण सोशल वर्क करण्याच्या दृष्टीनं त्या समाजाची ओळख करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. लग्नाच्या अगोदरपासून असं काम करण्याचं त्यांच्या मनात असणार, म्हणून माझं लग्न झाल्यावर ते माहिती काढायला लागले ना, ह्या मुसलमानांत काय असतं? यांच्यात काय करतात? त्यांच्यात काय करतात? त्यांचे रिवाज काय आहेत? त्यांचं राजकारण काय आहे हे सगळं बघत होते. ही सगळी माहिती काढायची का, तर समाजात काम करता यावं. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात विचार होते. त्या वेळी मला काही कळलंच नव्हतं. ते अशा रीतीने माहिती काढत होते. इथली भाषा काय आहे? इथली भांडणं काय आहेत? .