Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकाशकीय
[पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने]


 श्रीमती मेहरुन्निसा दलवाई यांची ही स्मृतिगाथा वाचकांच्या हाती देताना आमचे मन अनेक संमिश्र भावनांनी भरून आले आहे. श्री. हमीद दलवाईंच्या अकाली मृत्यूमुळे केवळ पुरोगामी मुस्लिम चळवळीचेच नव्हे तर साधनेसारख्या धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा पाठपुरावा करणाऱ्या अनेक संस्थांचेही नुकसान झाले. त्यांचे जीवन हा मुस्लिम समाजातील अज्ञान, रूढी, परंपरा यांना सदैव खतपाणी घालणाऱ्या धार्मिक कडवेपणाविरुद्धचा अखंड संघर्ष होता. मुस्लिम समाजात पुरोगामित्वाचे वारे वाहत राहावेत, आधुनिक शिक्षणावर त्याचा भर असावा आणि भारतीयत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये वाढत राहावी यासाठी मुस्लिम समाजातील कट्टरपंथी आणि मुल्लामौलवी यांचा रोष पत्करून आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा आता त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी उचलली आहे. त्यांनी साध्यासुध्या शब्दांत सांगितलेल्या आपल्या सहजीवनाच्या आठवणी अनेक ठिकाणी वाचकांना अस्वस्थ करून सोडणाऱ्या आहेत. हमीदभाई आणि साधना साप्ताहिक यांच्यामध्ये अतूट स्नेहबंध निर्माण झाले होते. म्हणून या आठवणींवर साधनेचाच अधिकार होता. हे पुस्तक प्रकाशित करून हमीद दलवाईंच्या जीवनाची अधिक ओळख वाचकांना करून देण्याचा हा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी झाला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे.

-कुमुद करकरे