आणि रात्री अकराच्या पॅसेंजरने परत गेलो. आमच्या स्वतःच्या घरी जायला. ह्यांना घर कुठं होतं? आम्ही महंमददांच्या घरी गेलो. महंमद दलवाईंचं घर होतं तिथं. रात्रीची गाडी. गाडीमध्ये चढल्यावर जागा नाही. मला जेमतेम बसायला जागा मिळाली आणि सामान ठेवतात तिथं जागा मिळाल्यावर हे झोपले. मला काही झोप नाही. मी अशी त्यांच्याकडे बघत होते. त्यांची हालचाल तर बघावी. काय गंमत. हात हलवायची सवय आहे. डोळे मिचकवायची सवय आहे. आणि क्षणभर मला असं वाटलं की हा माणूस वेडा तर नाही ना! असं काय तो हात पाय करतो. स्वतःची बोटं, असे हात झटकायची सवय आहे. आणि मी म्हणते, बापरे! आपलं कुठं चुकलंय की काय? हे काय आपल्याला झालंय? असं करून ती रात्र गेली आणि सकाळी गाडी मुंबईला आली. सामान घेतलं. सामान पण आमच्याकडं फार नव्हतं. एवढी पोटली. पण ह्या दरम्यान मी काय केलं होतं? लग्न झाल्यानंतर उषाने मला एक सजेशन दिलं होतं. ती म्हणाली होती की तुझे कपडे बिपडे काय आहेत ते घरातनं काढ बाहेर. का तर ह्याची परिस्थिती चांगली नाही. तो कपडे घेऊ शकणार नाही. तू ऑफिसला कशी येणार? तर तू काही तरी तुझी सोय कर. त्यामुळे मी लाँड्रीत कपडे द्यायचे म्हणून जवळ जवळ सगळे माझे कपडे त्या बास्केटमध्ये घालून उषाकडे आणून ठेवायची. थोडेसे दागिने पण अंगावर होते. चार बांगड्या होत्या, त्या चार बांगड्या माझ्याच पैशातनं केलेल्या होत्या. आणि आईच्याकडचा एक हार होता. ते सगळं घालायला कधी तरी द्यायची. कानात बिनातलं पण. तर ते मी परत दिलंच नाही. ठरवून दिलं नाही आणि घेऊन जाते म्हणूनसुद्धा सांगितलं नाही. माझ्या अडचणीला थोडीशी मदत व्हावी म्हणून घेतलं.
मग आम्ही महंमददांकडे येऊन राह्यलो. तिथं मी जवळजवळ दोन महिने होते. त्यांच्याच घरी. त्यांची जागा मोठी होती. त्यांनी आम्हांला ठेवून घेतलं. महंमददांचं लग्न झालेलं नव्हतं. मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. ती बायको पण तिथं राहात नसे. ती गावाला होती आणि त्यांचा एक गडी होता. त्यांची बहीण आली होती माहेरपणाला दोन मुलं घेऊन आणि त्यांचा नौकर होता. तो घरच्यासारखाच होता. तो स्वैपाक करायचा. ती तीन भावंडं होती. तिकडे आम्ही राह्यलो. दुसऱ्या दिवशी माहेरी पत्र टाकलं की मी आपल्या पद्धतीप्रमाणे हमीदशी लग्न केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी आज त्याच्या घरी आलेली आहे. तिथे दोन महिने राहिले. मग पगार घेतला. पगार घेतल्याशिवाय तर काही होत नाही. त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्याकडे कपडेही नव्हते.