पान:मी भरून पावले आहे.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मग तिला तिथं राहावेना. दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेतली होती. बहिणीची खोली होती तिकडे महंमदअली रोडला. तिने मला काय सांगितलं की किल्ली मी शेजारी ठेवेन आणि तू सुट्टी घे उद्या आणि तुम्ही तिकडे या. आम्ही तिथे जायचं ठरवलं. आजीने काय केलं? आजी असं सांगत होती नंतर की तीन दिवस ती चांगला डबा भरून देत होती. तिला वाटायचं की मी रजेवर आहे आणि ती जेवण करून बहिणीच्या हाती पाठवायची. मला देते म्हणून सांगून ती बहीण डबा घ्यायची. पण ते जेवण काही आम्हांला मिळालं नाही. बहिणीने सांगितलंच नाही. ते लोक खायचे आणि डबा परत पाठवायचे. आजीला कळलंच नाही!

 मी जेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बहिणीच्या घरी गेले आणि दरवाजा उघडला तेव्हा त्या घरामध्ये चहा-साखरसुद्धा नव्हती. बहीण निघून गेली होती. आम्ही थोडा वेळ बसल्यानंतर हे म्हणाले, “कशाला आपण बसलोय या खोलीमधे? काय गरज आहे आपल्याला बसण्याची? चल मेहरू, आपण आज पिक्चर बघू या." आणि आम्ही दोघं उठून पिक्चर बघायला गेलो. आम्ही पिक्चर बघितलं, बाहेर खाल्लं थोडंफार आणि यांनी मला घरी आणून सोडलं आणि ते गेले. दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसला जायला लागले. माझ्या आजीला हे माहिती नव्हतं. तिला वाटलं की मी पंधरा दिवस रजा घेतलेली आहे आणि मी जाते कुठे तरी. आता लग्न झालेलं आहे, मुलगी कुठे जाते, काय करते हा प्रश्नच नाही. आणि अशा रीतीनं पंधरा दिवस आम्ही नुसतं ऑफिस आणि घर, घर आणि ऑफिस असं केलं. कुठे भेटणं नाही, एकत्र येणं झालंच नाही. त्याच्यानंतर आजी म्हणाली, 'मेहेरबानी कर आणि मला पुण्याला सोड नेऊन आणि तू तुझ्या घरी जा. तू अशी अजिबात राहू नको. इथं तुला राहाण्याची काही गरज नाही.' आणि घरात तर चालू होतंच सगळं, धुसफूस, धुसफूस. आजी जाणार म्हणून आम्ही आजीचे डोळे तपासायचं ठरवलं. मग हे म्हणाले, मी येणार. दवाखान्यातच आजीची नि यांची भेट झाली. आम्ही दोघांनी मिळून डॉक्टरकडे आजीला नेलं. तिचे डोळे तपासले. आणि माझा नवरा म्हणून ती खूपच तऱ्हांनी खूष झाली. पुढे सुद्धा खूपच ती कौतुक करायची. का तर हे पण तिच्या गळ्यात पडून राहायचे आजी आजी म्हणून. तर नंतर असं ठरलं का आजीने पुण्याला जायचं. तिकीट काढलं. हे म्हणाले, आपण दोघंही सोडायला जाऊ या पुण्याला. तीनच्या गाडीला आम्ही बसलो. आजीला घेतलं आणि पुण्याला गेलो. संध्याकाळी सातच्या सुमारास पोहोचते गाडी. आजीला घरी सोडलं. आत्याने आमच्या जेवण केलं. ते आम्ही जेवलो.

मी भरून पावले आहे : ३१