Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी ठरवलं का त्यांना मुलगी पसंत आहे. काही का होईना, शेवटी मुसलमान मुलगी आली ना आपल्या घरात? बाहेरची असली तरी आपण अॅक्सेप्ट करू म्हणून त्यांनी अॅक्सेप्ट केलं. लग्नाच्या वेळेला सगळे येणार असं ठरलं. त्या दृष्टीनं आमचं आपलं रोज भेटणं-बिटणं चाललं होतं.
 भेटण्यात हाच विषय असायचा, दुसरं काय? आमच्याकडे दुसरा काय विषय असणार? माझ्याकडे त्या वेळी विषय नव्हता. मी काही सोशल वर्कर नव्हते. लेखिका नव्हते. आणि प्रेमाचं काही बोलण्याचा संबंध नाही. का तर प्रेम कुणाशी केलं नाही. त्यामुळे प्रेमात काय बोलायचं हेही कळलं नाही. मग ह्याच्या गप्पा, त्याच्या गप्पा, काय आता पुढं करायचं? कुणाला भेटायचं? कसं करायचं? हे सगळं आम्ही बोलत असू. त्यांना पण एक गोष्ट दहा-दहा वेळा सांगायची फार सवय होती. पण ते अशा रीतीनं मांडायचे की दहा वेळा ऐकलं तरी कंटाळा यायचा नाही. आणि मी एकदा बोललेलं दुसऱ्यांदा बोलले की 'हे काल तू बोलली होती. पुढे बोल, हेच काय बोलते?' असं म्हणायचे. असं ते त्यांचं असायचं. त्याच्यानंतर आमची तारीख ठरली. तारीख ठरल्यानंतर मी खादीच्या दोन नवीन साड्या घेतल्या. ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलं.

 आई-वडिलांना सांगायचं नाही, सांगितलं तर लग्न होणार नाही असं मला वाटत होतं. हे पक्के होते. आपण इतका विरोध केल्यानंतर लग्न होण्याची काय शक्यता आहे, असं आईला वाटलं. मग काय झालं. मी पुण्याहून आल्यानंतर माझ्या येण्याजाण्यावर आईवडिलांनी चेकिंग ठेवलं. मी जेव्हा पुण्याहून आले ना तेव्हा माझी आजी म्हणाली की मी जाते तिच्याबरोबर आणि तिच्या आईला सगळं समजावून सांगते तर काका म्हणाले, असं करू नको. तू जाऊन सांगितलं आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं, आणि तिला डांबून ठेवलं तर ती काय करणार? तर तू तिच्याबरोबर जा, पंधरा दिवस घरात रहा. काय विषय निघतो बघ. जमवाजमवी कर. पण पंधरा दिवसांमध्ये धुसफूस धुसफूसच. आजीच्या बरोबर कोणी चांगलं वागत नव्हतं. माझ्याबरोबर कोणी चांगलं वागत नव्हतं. माझ्या वेळेवर बंधन घातलं जायचं. मला टाँटिंग-बिंटिंग सुरू केलं त्यांनी. हैराण करायला सुरुवात केली. माझ्या आजीला ते सहन व्हायचं नाही. पण बोलायचं नव्हतं. त्यामुळे ती गप्प राहिली. मी ऑफिसवरून आले की रात्री झोपताना कुजबुज कुजबुज. असं असं झालं म्हणून मी तिला रिपोर्ट द्यायची. बाकी काही नाही. तारीख तिला माहिती होती.

२८ : मी भरून पावले आहे