त्यांचा एक मित्र होता शिवाजी सावंत म्हणून. लेखक शिवाजी सावंत नव्हे. तो इन्श्युरन्सचं काम करत होता आणि त्यांनी उषाचा आणि माझा एकदा इन्श्युरन्स काढला होता. तर सगळी माहिती त्याच्यात मिळाली ना त्यांना! आणि हे पण काय मुलगी शोधत होते की काय, आणि सावंतला पण मी पसंत पडली असावी. तर त्यांनी दलवाईंना सल्ला दिला की ही मुलगी चांगली आहे. मुसलमानाची आहे. नोकरी करणारी आहे. कर ना लग्न. काय हरकत आहे तुला? असं झालं म्हणून ते बघायला आले. तर शिवाजी सावंत पण बरोबर आले होते. ते बाजूला गेले आणि त्यांनी आम्हांला बाजूला सोडलं. तर मला बघितल्यानंतर त्यांनी हसून आणि डोळा मारून विचारलं, "काय, खादी तुम्ही नेसता ती आवड आहे म्हणून नेसता का खादी कमिशनमध्ये आहे म्हणून नेसलंच पाहिजे म्हणून नेसता?" म्हटलं, “हो बाबा, एवढे जाडे भरडे असतात कपडे. कोण नेसणार? साड्या घातल्या की पोटातसुद्धा दुखतं. त्याला काय शेप नाही. रंग नाही. रूप नाही. असं कुणाला आवडेल? घालायलाच पाहिजे ना म्हणून मी घालते. माझ्या आवडीचा कुठे प्रश्न आहे? पण तुम्ही का घालता खादी?" तर म्हणाले की, "मला खादीबद्दल आदर आहे. मी गांधीवादी आहे. रुमालसुद्धा मला खादीशिवाय चालत नाही." मग माझं शिक्षण किती झालं, त्यांनी विचारलं. 'मी इंटरपर्यंत गेलेली आहे. इंटर फेल झाले म्हणून नोकरीला लागले.' चहा घेत घेत बोललो आम्ही. उषाने चहा आणून दिला आणि ती निघून गेली. त्यांनी असं सांगितलं की, “मला नोकरी नाहीये. तुम्हांला सांगतो की राहायला जागाही नाहीए. अडचण आहे. घरात भावंडं खूप आहेत आणि गरीब आहोत आम्ही. कोकणात राहाणारे आहोत आणि इतकं असूनसुद्धा मी इकडे आलो. तुमच्याबद्दल ऐकलं आणि मला वाटलं की ही मुलगी आपल्याला लग्नाला योग्य आहे. माझ्या मनात लग्न करायचं आहे. तुमच्या मनात काय आहे?" हे ऐकून मी चकित झाले की एखादा मनुष्य एवढा फ्रँक असू शकतो! एवढा प्रामाणिक एखादा पुरुष असू शकतो की तो स्वतःबद्दल सुरुवातीलाच सगळं काही सांगेल? का, तर कोणी सांगत नाही. सगळे लपवतात आणि नंतर एक एक रहस्य खुलतं आणि बाईला त्रास होतो. असं झालं नाही. तरी त्यावर मी म्हटलं, लग्न? नाही रे बाबा, पण माझ्या आईला कळलं तर माझी आई फोडून काढेल मला. तुम्हांला पाहिजे असेल तर माझ्या आईला भेटा, असं मी म्हणाले. तर ते म्हणाले, "लग्न तुम्हांला करायचंय, आईला करायचं नाहीए. तुमच्या मनात असलं तर पुढची जबाबदारी मी घेतो ना." तर मी म्हटलं की मी विचार करीन जरा.
मी भरून पावले आहे : २१