मी आजारी होते का काय होते म्हणून दोन-चार दिवस रजेवर गेले होते. रजेवरून आल्यानंतर उषा मला भेटली आणि म्हणाली, “अग, एक न्यूज आहे तुझ्यासाठी." “काय?” "हमीद दलवाई म्हणून एक तरुण तुला भेटायला आला होता. तो लेखक आहे. आर्टिस्ट आहे. दिसायला पण चांगलाय हं मेहरू. आणि मला वाटतं की त्याच्या काही तरी मनात असलं पाहिजे." मी म्हटलं, “चल – चल कोण होता? काय होता? कुठे होता?" तेव्हा नावही ऐकलेलं नव्हतं. आणि तेव्हा असं होतं की मी खान आहे. आमच्यामध्ये खान, शेख आणि सय्यद. खानचं खानमध्ये, शेखचं शेखमध्ये आणि सय्यदचं सय्यदमध्ये लग्न होतं. त्यामुळे दुसरीकडे लग्नच करणार नाही. आणि कोकणी आणि दख्खनी यांच्यामध्ये फरक होता. हे कोकणमधले ते नंतर कळलं मला. उषा म्हणाली, "तुला भेटायला काय हरकत आहे? नाही कशाला म्हणतेस?"
त्या वेळी आमची सहा माळ्यांची बिल्डिंग होती. के. सी. कॉलेज आता आहे ना, तिथे त्या वेळी आमचं ऑफिस होतं. आणि वर गच्ची होती. ती म्हणाली, “आज तो चार वाजता येणार आहे. आपण जाऊ या गच्चीवर. काय हरकत आहे जायला?" चार वाजता मी वर गेले. वर गेल्यानंतर हे आलेले दिसले. त्यांची ओळख करून दिली, “हे हमीद दलवाई. ही मेहरू." मला म्हणाली, “मी जरा चहा घेऊन येते." असं म्हणून ती गेली. असं मी त्यांना बघितलं. बघितल्यानंतर जे माझं इंप्रेशन त्यांच्याबद्दल झालं ते मी सांगायला हवं. बारीकसा, किडकिडीत माणूस, गाल असे पडलेले, दाढी वाढलेली. म्हणजे आपण एखाद्या मुलीला बघायला जातोय तर दाढी तरी करून जावी याचं सुद्धा भान नसलेला. खादीचे कपडे अंगावर. पांढरे कपडे पण मळलेले, फाटलेले. असं वाटलं की एखादाच जोड असेल या माणसाकडे. पण डोळे मात्र घारे होते. आणि सगळ्या अवतारावर ते मात करीत होते. एक डोळा मारायची सवयही दिसली. बोलताना तर विशेषच.