चालायला लागली की तिच्याकडं बघत बसावं असं वाटायचं. म्हणजे बायकांना वाटायचं तर पुरुषांना किती वाटेल बघा. असं बोलणं-बिलणं जरा ठसकेदार. पण तिला बिचारीला मूल-बाळ नव्हतं. माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. तिचं लग्न केव्हाच झालं होतं. तिला लग्न झाल्यानंतर नोकरी मिळाली आणि माझ्या थोडी अगोदर ती लागली होती. बऱ्याच मैत्रिणी होत्या पण हिच्यामुळं मला हमीद मिळाला असं बोलायला हरकत नाही. तिच्यामुळे हमीद माझा झाला. ती फार मायाळू होती. दिलदार होती. मदत कधीही करायची. पैसा खूप होता. बहिणींच्या, भावाच्या मुलांना सांभाळलं तिने. शिकवलं तिने. आपलं मूल नाही म्हणून तिने इतरांकडे दुर्लक्ष केलं नाही. माझ्या लग्नाची पण तिला खूप काळजी वाटायची. ती नेहमी म्हणायची, “नाही ग तुझी आई बघणार. तू आता नोकरी करते. पैसे कमवते. तुझ्या घरात तुझे पैसे येतात. आता वडील घरात पैसेपण देत नाहीत. त्यामुळे तू कशाला अशी अपेक्षा ठेवते की ती तुझं लग्न करेल म्हणून? तू एखाद्या हिंदू मुलाशी लग्न का नाही करत? काय हरकत आहे? तुला मुसलमानच कशाला पाहिजे? समजा आईने तुला कराचीला नेलं, पाकिस्तानला नेलं, तुझं एखाद्या दाढीवाल्याशी लग्न-बिग्न करून दिलं तर सगळं आयुष्य फुकट जाईल तुझं. कशाला विचार करते? तुझं वातावरण वेगळं आहे. तू विचारांनी वेगळी आहेस. तू डेअरिंग कर." पण माझ्यात ना डेअरिंग नव्हतं. मी आईला आणि धाकटा जो भाऊ होता त्याला घाबरत होते. तो लहान असल्यामुळे गुर्मी जरा जास्त आणि आईचा लाडका होता. त्यामुळे तो जरा कडक होता. मला भीती वाटायची. त्यामुळे मी घरात बोलायची नाही की तू माझ्यासाठी कोणी शोध. अमूक कर असं मी कधीच सांगितलं नाही.
माझं दलवाईंबरोबर लग्न होण्याआधी एक मुलगा मला बघायला आला होता. तो बी.ए.एल.एल.बी. होता. देखणा होता. परिस्थितीनेसुद्धा चांगला होता. तो रेशनिंग ऑफिसमध्ये कामाला होता. संध्याकाळची वेळ होती. आईने मला ट्रेमध्ये चहा न्यायला सांगितला. चहा नेता-नेता साडीत पाय अडकला. सगळा ट्रे खाली पडला. आई मनातल्या मनात खूप संतापली. तिने ते सगळं आवरलं. मग मी बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. त्याने मला दोन-तीन प्रश्न विचारले. तुमचं नाव काय? किती शिकलात? कुठे काम करता वगैरे वगैरे. इतक्यात सगळीकडचे लाईट गेले. आईने कंदिल लावला. तो निघून गेला. काही दिवसांनी माझे पुण्याचे मामा आमच्याकडे आले. त्यांचं नाव बिरू पटेल होतं. तो पुण्यातला प्रख्यात माणूस.