पान:मी भरून पावले आहे.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एका रात्री काय झालं, पोलीस टॉर्च फिरवत होते. आमच्याच घरावर सारखा संशय होता, आणि खरोखर बिल्डिंगमधले एक 'दादा' आले आमच्याकडे. आल्याबरोबर आईने त्यांना झटकन आत घेतलं आणि वडिलांच्या शेजारी बसवलं. मग ती दारात अशी उभी राहिली. तितक्यात पोलीस वर चढले. पोलीस म्हणाले, आम्हांला घराची झडती घ्यायचीय. ती म्हणाली, "बाबा, माझी मुलं झोपलेली आहेत. मी मुसलमान बाई. रोजे-बिजे असतात. आता कुठं बघणार तुम्ही? काय पाहिजे तुम्हांला? "नाही, राजाराम पाहिजे.” “मी सांगितलं ना, नाही आहेत?" पोलिसांनी तिचं ऐकलं आणि ते निघून गेले खाली. कधी तरी नंतर पोलिसांनी त्यांना धरलं, जेलमध्ये टाकलं. आई त्यांना सोडवायला जामीन सुद्धा राहिली. त्यामुळे तिचा दबदबा फार होता. माँजी म्हणून ती मशहूर होती तिथं. सगळे माँजी म्हणून तिला मान देत असत. सगळ्यांची, शेजारच्या काकूची बाळंतपणं झाली, कोणाचं काय झालं तर ही पहिल्यांदा हजर. कुणी आजारी पडलं तर ही पहिल्यांदा हजर. दारात बसून मस्ती करतात म्हणून मुलांना लाख शिव्या दिल्या तरी लोकं बोलायची नाहीत. तोच धीटपणा माझ्याही अंगात आला. पण त्या वेळी मात्र मी भित्री होते. सगळं हे बघितलं की मी अशी कापायची. मला भीती वाटायची. आमच्या पुण्याचं वातावरण वेगळं होतं आणि या घरातलं वेगळं होतं आणि त्याच्यातसुद्धा आम्हाला घरातनं एकटं इकडं-तिकडं जाण्याची परमिशन नव्हती. आमच्या दोन खोल्या, बाहेरच्या खोलीत कुणी पाहुणा-रावळा आला की आम्हांला त्याच्यासमोर जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. गोषा नव्हता, पण मुलींनी पुढे यायचं नाही; बोलायचं नाही. आम्ही काय बुरखा घालत नव्हतो. पण कुणी आमच्याकडे यायचं नाही. माझ्या भावाला ताकीद दिली होती : तुझे मित्र खाली. मित्र एकही वर चालणार नाही. कसलेही संबंध नाहीत. पिक्चरला जायचं नाही. पिक्चरला जायचं असेल तर आईच्या बरोबर जायचं. भावाबरोबर जायचं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी हमीदना सांगितलं ना, की आईच्या बरोबर दर आठवड्याला पिक्चर बघत होते तर हे म्हणायचे, “काय गंमत करते. आईच्या बरोबर काय पिक्चर बघायचा असतो?" पण त्या वेळी कुणाला शोधणार होते? स्ट्रिक्ट वातावरण.

 आता खादी कमिशनमध्ये मी लागले, तेव्हा माझी एक मैत्रीण होती उषा म्हणून. उषा वढावकर. लग्न झालेली होती. कस्टममध्ये नवरा होता. पैसेवाली होती. काळी होती पण तिच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं. त्यामुळे इतकी अॅट्रॅक्टिव्ह दिसायची ती. बघतच राहावं आणि राहाणं पण टिपटॉप असायचं ना!

मी भरून पावले आहे : १७