पान:मी भरून पावले आहे.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी बोलतच नसे आणि त्यांचं सगळं झाल्यावर मी म्हणायची, "चला हां, आता झोपा तुम्ही. सकाळी आपल्याला उठायचंय. मला पण ऑफिसला जायचंय.” ते आल्याबरोबर, “जेवलीस? माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस," असे म्हणायचे. मी म्हणायची, “हे बघा, असं बोलायचं नाही. मी तुमच्याशिवाय जेवणार नाही." ते माझ्या बोलण्याप्रमाणे वागायचे. ते जरा लाडही करायचे माझे. मग ते झोपून जायचे. सकाळी उठलं की सगळं नॉर्मल. असला मी मार्ग काढला आणि मग शांतता झाली. आईचा राग इतका भयंकर, अशी मारायची की एकदा मोठ्या भावाचे गुडघे फुटले होते. कशाने तरी, फूंकणीने मार, बेलण्याने मार आणि रक्त निघायचं. धाकट्या भावाला एकदा तिने कात्री फेकून मारली तर पायाला लागलं आणि पाय रक्तबंबाळ झाला. त्यामुळे डॉक्टरकडे धावाधाव करावी लागली.

 आईचा स्वभाव वेगळा होता, वडिलांचा स्वभाव वेगळा होता. तिचा स्वभावच तापट होता पण वडिलांचा काही कमी होता असं नाही. ते प्यायचे, ही बोलायची. मग ते मारायचे. सकाळी दोघंही नॉर्मल व्हायची. बरं, दुसरी गोष्ट अशी होती की आमची आई होती फार बोल्ड. मार खायलासुद्धा भ्यायची नाही. त्याचं तिला काहीच वाटायचं नाही आणि वडील थोडेसे भित्रे होते. ते काय करायचे? तिसऱ्या माळ्यावर आमचं घर होतं. रात्री खिडकीच्या बाहेर हात करून बसायचे आणि समजा मेन रोडवर मारझोड झाली, दगडफेक झाली, काही झालं तर हे भिऊन वरचे दरवाजे, खिडक्या बंद करायचे. तर आमची आई टिंगल करायची आणि खाली रस्त्यावर जायची. सगळी माहिती काढायची आणि वर येऊन सांगायची, "क्या तेरा बाप डरपोक है। यहाँ खिडकी बंद करता है। वो क्या पत्थर उपर आनेवाले है? क्या खान, वो पत्थर उपर आनेवाला है क्या?" असं म्हणायची. मग गंमत सांगायची, “तेरा बाप मालूम है क्या? बहोत डरपोक है." हे कशावरनं, तर ते मिलिटरीमध्ये होते. एकदा छावणीमध्ये बसले, रात्रीची वेळ होती, सगळ्यांनी बंदुका रोखलेल्या होत्या, शत्रू आला तर मारायचा म्हणून. जवळच्या झाडांची पानं हलली, आवाज आल्याबरोबर यांनी गोळी झाडली. नंतर जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा तो कुत्रा होता. तर हेच यांनी येऊन सांगितलं असेल. आईने त्याचा इश्यू केला आणि दर वेळी बोलायची, “अरे क्या तेरा बाप। वो मिलिटरी में गया। कुत्ते को मारा। बंदूक से किस को मारा? आदमी उसे नहीं मिला। कुत्ते को मारा।" अशी ती टर उडवायची. अशा रीतीने ती सहज बोलायची. तिनं एक सांगितलं की हे दुसरं बोलायचे आणि तरीही ती दोघं एकत्र होती.

१६ : मी भरून पावले आहे