पान:मी भरून पावले आहे.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी गरोदर असताना ते ह्यांना म्हणायचे, "नाही,नाही, ती आता भारीपाँव आहे. तिनं अशा शिड्या आता चढता कामा नयेत. तिने ऑफिसची दगदग सहन करता कामा नये. घरातलं सगळं काम तिच्या स्वाधीन करू नका. तिला टॅक्सीनं जायला सांगा!" म्हणजे इतकं प्रेम करायचे की हे सुद्धा म्हणायचे, “काय आहे कुणाला माहिती! मी गेलो की सगळं पुराण तुझंच!" दलवाईंच्या कामाबद्दल त्यांना खूप आदर होता. बाईंना पण खूप आदर होता. त्यामुळे गेलं की खूप रिस्पेक्ट द्यायचे. लग्नाच्या वेळी जेव्हा ते विचारायला गेले तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं की, “तुम्ही लग्न जमवलेलं आहे. आमचा काही त्याला विरोध नाही. तुम्ही खूप मोकळेपणानं बोलता. सगळं खरं बोलता. तुमच्या मनात लग्न करायचंय. तुम्ही दोघं जाऊन लग्न करा. नंतर या आमच्याकडे. आम्ही लग्न लावून दिलं तर तिच्या आईवडिलांच्यात आणि आमच्यात वाईटपणा येईल. आमचं दार तुम्हांला उघडंय, लग्न केल्यानंतर. पण एक लक्षात घ्या, या मुलीवर आम्ही खूप प्रेम केलंय. खूप लाडाने सांभाळलीय हिला. तुमच्या घरातनं कुठलीही कम्प्लेंट तिच्या बाबतीत यायला नको." इतकंच नाही तर लग्नानंतर जेव्हा मी एकटी जायची तर ते लगेच विचारायचे, "तू हमीदबरोबर भांडून आलीस? अशी भांडून आलीस तर आपण घरात घेणार नाही. तो तुझा नवरा आहे. तिथंच तू राहिलं पाहिजे."

 मी शाळेमध्ये असताना गांधीजींची हत्या झाली. गांधीजींवर खूप श्रद्धा असायची आमच्या घरातसुद्धा. गांधीजी गेले, गांधीजी गेले म्हणून फार गडबड उडाली. सगळे तेच सांगायला लागले. सगळे घाबरले. मी तेव्हा माझ्या मामाकडे होते. माझे एक मावसभाऊ होते तिथं. गडबड उडाली घरातनं. “आता घरी जा. घरी जा", म्हणायला लागले. आता काय करायचं? मग त्या भावानं मला सायकलवरनं आणून घरी सोडलं. मग सगळी दारं-खिडक्या बंद केली. त्या वेळी हवा अशी होती की कुठल्या तरी मुसलमानानं खून केला, त्यामुळे भीतीने कोणी बाहेर पडत नव्हते. खरी बातमी कळत नव्हती म्हणून सगळे घाबरत होते. गांधीजी गेल्यानंतर त्यांच्यावर नवी रेकॉर्ड निघाली, 'सुनो सुनो ऐ दुनियावालो, बापू की ये अमर कहानी।' गांधींच्या एका स्मृतिदिनाला फार भावनात्मक होऊन मी ते गाणं शाळेत म्हटलं आणि माझ्या काकीलासुद्धा ते खूप आवडलं होतं. मला गाण्याची आवड होती, माझा आवाज चांगला होता आणि माझे मामा जे होते ना, त्यांच्याकडे काही कार्यक्रम झाला की ते मला बोलवायचे आणि त्यात गायला लावायचे. त्या वेळी मी सिनेमाची गाणी म्हणायची. तेव्हा लता मंगेशकर नवीनच होती.

मी भरून पावले आहे : १३