त्या सगळ्यांना माहीत होतं की बाईंची मी लाडकी आहे. त्यामुळे तेही माझे लाड करायचे आणि मी गोष्टी सांगायला गेले की ते माझं खूप कौतुक करायचे. बघ, आता हिने सुरुवात केली. मी गेल्याबरोबर विचारायचे, आज स्वैपाक काय झाला? माझे काका विचारायचे, "मेहरू, आज अम्माने क्या पकाया? आज बुबूने क्या पकाया?" आमच्या आजीला बुबू म्हणायचे. तर मी म्हणायची, 'बैंगन पकाये। बैंगन भरके पकाये। बैंगन का भरता पकाया।' 'कैसा हुआ था?'... अजून त्यांची मुलं माझी चेष्टा करतात. का आमचे वडील तुला असं चढवून बोलायचे आणि तू ते बैंगन कसं करतात, वांगी कशी शिजवतात ह्याचं वर्णन करत होतीस, त्यासाठी दहा वेळा तुला विचारत होते.
शेवटी बाई गेल्या तेव्हा मी त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या सगळ्या मुलांची लग्नं झालेली होती. त्या एकट्या होत्या. शेवटपर्यंत त्यांनी कुणाची सेवा घेतली नाही. जेव्हा खूपच थकल्या तेव्हा त्यांनी जाणूनबुजून मरण्याचा प्रयत्न केला. कसा? त्यांना ताप आला होता खूप, त्यावर त्या खूप ताक प्याल्या, जबरदस्तीने. जाम सर्दी झाली, न्यूमोनिआ झाला. डॉक्टरला बोलावलंच नाही आणि त्या अंथरुणातच गेल्या. कुणाला कळलंसुद्धा नाही. त्या गेल्यानंतरसुद्धा आम्हांला कळलं नाही. फक्त त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला बोलावलं. ती मुलगी जवळ होती. तिला बोलावलं आणि त्यांच्या पद्धतीनं मग शेवटचं सगळं करण्यात आलं. विधी न करता दहन करण्यात आलं. त्यांच्यानंतर माझे काका बरेच दिवस होते. काही वर्ष होते. त्यांची मोठी मुलगी जायची. आम्ही जायचो. शेवटी शेवटी मी गेले की ते मला सोडायचेच नाहीत. माझे दोन्ही हात असे धरून बसायचे. सांगायचे, तू माझ्याकडे राहायलाच ये. त्यांची आणखीन एक गोष्ट म्हणजे दलवाईंच्यावर खूप प्रेम केलं त्यांनी. माझं लग्न त्यांनी जमवलं आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे भेटायला जायचो. फार टाईमशीर होते दोघं. म्हणजे आता समजा, बाराला बोलावलं तर बारालाच गेलं पाहिजे. पहिल्याच दिवशी आम्ही बाराला बोलावल्यावर सव्वा बाराला गेल्यानंतर घड्याळ बघितलं त्यांनी आणि ह्यांना म्हणाले, “हमीद, तू बाराला आला नाहीस. सव्वा बाराला आलास." तेव्हापासून हे काय करायचे, त्यांच्याकडं जायचं असेल आणि टाईम दिला असेल तर पंधरा मिनिटं अगोदर घराजवळ जाऊन उभे राहायचे आणि बरोबर एक्झॅक्ट टाईम झाला की घरात जायचे. काका माझी खूप विचारपूस करायचे. ती ऑफिसमध्ये जाते ते ऑफिस किती लांब आहे? ती पुलावरनं जाते, पुलाच्या शिड्या किती आहेत?