काका आजीला पैसे देत असे. विचारत असे. मुलं येत असत. तसं काय त्यांचं भांडण वगैरे नव्हतं. आमच्या घरात पडदा नव्हताच. आमची आई बुरखा घालत असे. पण मी आईकडे राहात नव्हते म्हणून मला काही बुरखा घालावा लागला नाही. पण नंतर काय झालं; आमची आई पडली आजारी आणि डॉ. भडकमकर जे मुंबईचे होते, त्यांनी एकदा सांगितलं आमच्या वडिलांना की या बाईचा बुरखा तुम्ही काढा, नाही तर हिला टी.बी. होईल. त्या काळामध्ये टी.बी. म्हणजे भयंकर रोग समजला जात होता. आमच्या वडिलांनी मान्य केलं आणि तिला बुरखा काढायला लावला आणि मला असं वाटतं की तिने बुरखा काढला त्यामुळे आम्हांलाही बुरखा घालायची जरूरच पडली नाही.
माझी आई धार्मिक होती. ती पाच टायमाची नमाज पढायची. तिला धर्मावर टीका केलेली चालायची नाही. मी जरा चेष्टा केली की बाबा हे कसलं आहे, जहन्नुम कसला, जन्नत कसला, तिथे कसले फरिश्ते येतात आणि विचारतात? माझे वडीलसुद्धा कधी कधी टिंगलीमध्ये बोलायचे, "हे बघ, तू फार पापं करते म्हणून तुला नमाज पढण्याची जरूर पडते. आम्ही पाप करतच नाही.” हे वडिलांचंच मी घेतलेलं होतं. मला पण असंच वाटायचं. मग ते कधी कधी चेष्टेनं तिला म्हणायचे, “हे बघ पहिल्यांदा मी मरणार. मी जन्नतमध्ये जाणार आणि जन्नतमध्ये गेल्यावर असा पाय रोवून उभा राहणार. जेव्हा तू येशील तेव्हा लाथ मारणार आणि सांगणार की तू फार पापी आहेस, तू खूप पाप केलेलं आहेस. लोकांना शिव्यागाळी केलेली आहेस. तुला जन्नतमध्ये जागा मिळणार नाही. तू जहन्नुममध्ये जाणारेस." आणि मग त माझे पाय धरणार आणि म्हणणार, “मेरे खान, मेरे को माफ करो.” असं बोलल्यावर आमची आई अशी चिडायची, भडकायची, “तुम्ही ही चेष्टा करताहात.” ते म्हणायचे, “अग ही चेष्टाच आहे, नाही तर काय बरं! कोण मेलंय? कोण गेलंय तिकडे?" मी म्हणायची, “अग, कोणी मेलंय का? जन्नत जहन्नुम बघितलंय का? काय आहे ते या जगातच आहे आणि आपण कुठलं वाईट काम केलं की आपल्याला शिक्षा होते. आपलं वाईट होतं. हे सगळं इथंच आहे की, मग जन्नत आणि जहन्नुममध्ये काय आहे तिथं? मला काही धर्माची आयडिया पटायची नाही. पण लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. धर्माबद्दल आपण बोलायचं नाही. आमच्या आईच्यासमोर चालायचं नाही आणि पुण्याला आमच्यावर धर्माचा पगडाच नव्हता. त्यामुळे धर्माबद्दल काही विचारायचाही तिथे प्रश्न नव्हता. जबरदस्ती नमाज पढण्याचाही प्रश्न नव्हता.