हे पान प्रमाणित केलेले आहे.
"एकोणीस वर्षं माझा दलवाईंच्याबरोबर सहवास झाला. त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता. माझा संसार, माझी मुलं, आणि माझी नोकरी. मी काय काय सांभाळणार हो?... कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते... तीन मे एकोणीसशे सत्याहत्तर रोजी दलवाईंचा अंत झाला. शेवटी शेवटी ते मला दोन-तीनदा म्हणाले, 'मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे.'
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे."