त्यांच्या शिक्षणाचा, दत्तक घेण्याचा, वारसा हक्काचा, कुटुंब नियोजनाचा, त्यांना पायावर उभे करण्याचा आणि विशेष म्हणजे तलाकपीडित महिलांच्या पुनर्वसनाचा. आम्ही लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. त्या करता आम्ही वर्कशॉप, शिबिरं, परिषदा घेतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम घेतो. साऱ्या महाराष्ट्रभर आमची मोफत सल्लाकेंद्रं चालू आहेत. आमचं काम आता ऑल इंडिया लेव्हलवर चालतं. आम्ही लोकांना आमचे विचार पटविण्याचा प्रयत्न करतो. चौदाशे वर्षांपूर्वी जे कायदेकानून झाले ते त्या काळाच्या अनुषंगाने बरोबर होते, यात वादच नाही. पण आता काळ बदलला आहे, रीतीरिवाज बदलले आहेत. समाज बदलत आहे. जग बदलत चाललं आहे आणि म्हणूनच आपल्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या आधारावर आम्ही मागण्यांचं समर्थन करीत आहोत. त्याचा आधार समता आणि न्याय ही मूल्यं आहेत. धर्माच्या आधारावर आम्हांला न्याय नको.
आम्हाला वाटतं, धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. जे चांगलं आहे ते घेऊ या. पण जे वाईट आहे, जे अन्यायकारक आहे ते टाकून देण्याची तयारी पाहिजे. आम्ही भारतात राहतो. इथे इतर धर्माचे लोक राहतात. त्यांना जे कायदेकानून आहेत ते आम्हांलाही असले पाहिजेत. म्हणजे कायद्याचं संरक्षण आम्हांलाही मिळायला पाहिजे. वेगळी वागणूक आम्हांला नको. आम्ही हा देश आपला मानतो. त्याचा इतिहास, त्याचा निसर्ग, त्याचं ग्रंथभांडार, इथले नाना भाषिक लोक हे आमचे आहेत असं आम्ही मानतो. भारतात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या लोकांनी जर आपापला धर्म डोक्यावर घेतला तर देशाचं काय होईल? म्हणूनच प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात आणि मसजिद-मंदिरात ठेवला पाहिजे आणि 'माणुसकी' हा एकच धर्म मानला पाहिजे.
१९७० साली मंडळाची स्थापना झाली. एप्रिल १९७५ मध्ये दलवाई आजारी पडले. ३ मे १९७७ ला ते गेले. दलवाईंना काम करायला वेळच मिळाला नाही. पाच-सहा वर्षांच्या अवधीमध्ये जितकं जमेल तेवढंच त्यांनी केलं. कामाला गती यायला आणि आजारी पडायला एकच गाठ पडली. दलवाई गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जितकं जमेल तेवढं मंडळाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज जर दलवाई असते तर ती परिस्थिती वेगळी असती. आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत काम करू याची खात्री देतो.
☯☯☯