होते. गरबीबिरवी आमच्याकडे पढतात ना, ते काही आमच्याकडे सगळ्या लोकांना येत नाही. पण हे हॉस्पिटलमध्ये असताना आमचे नातेवाईक यायचे ना तेव्हा हे टिंगल करून हसत हसत डोळा इकडे मारायचे नि गरवी पढून दाखवायचे. असं किती वेळा झालेलं आहे. धर्माचा सगळा अभ्यास करून मग बोलायचे. मुल्लामौलवींपुढे बोलायची हिंमत होती. दोन-तीन गुप्त मीटिंगा झाल्या मुसलमानांच्या आणि त्याच्यात ते बोलले. ओपनली इतर मुस्लिम त्यांच्याबरोबर बोलायला बसायला तयार नव्हते. आज जे आम्हांला लोक सांगतात ना तुम्ही मुल्लामौलवींच्याबरोबर बसा. तर आम्ही काय म्हणतो, धर्म आमचं क्षेत्र नाही. आणि आम्हांला त्याच्यात घुसायचं नाही. बोलायचं पण नाही आणि आम्हांला काही गरज पण नाहीये ते करायची. पण दलवाईंनी तसा प्रयत्न केला होता. मीटिंग घेतली तरी ते मुसलमान कोणी बोलायला तयार नव्हते. बोलायला तर हवं नं?
'याला काय समजतंय. हा कोण बोलणारा?' चर्चा अशा झाल्या नाहीत. ह्या चर्चा त्या वेळी झाल्या पाहिजे होत्या की नाहीत? पण झाल्या नाहीत. म्हणजे दलवाईंनी या पद्धतीनं काम केलं असतं. पण आम्हांला ते जमत नाहीये. आमची ताकद कमी पडते हे आम्हांला मान्य करायलाच पाहिजे. पण आम्हांला जिद्द आहे. आम्हांला वाटतेय आमच्या समाजाबद्दल आस्था. हे आम्ही का करतो? मुसलमानांचे शत्रू आहोत म्हणून करतो काय? मी मुसलमान आहे. मला अभिमान आहे का माझा समाज माझा आहे. मला त्याची चिंता वाटते. समाजाला मदत करावी म्हणून मी काम करते, का मला त्याचा द्वेष वाटतो म्हणून मी काम करते? प्रेमापोटी करतेय, नि दुसरी गोष्ट अशी आहे का समाजामध्ये मेजॉरिटी आहे ती गरिबांची आहे. त्यांचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म किती पाळतात? नमाज पढणं, रोजे ठेवणं, जकात देणे, ईद आली का नवे कपडे शिवणं, शिरखुर्मा खाणं एवढाच धर्म सगळ्यांचा!
मला काही लोकं असं विचारतात की हमीद दलवाईंनी दहन का करून घेतलं? दहन करून घेतलं म्हणून ते हिंदूच होते असाही प्रचार केला जातो. दलवाईंनी दहन करून का घेतलं हे त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते नास्तिक होते. कोणत्याही धार्मिक संप्रदायावर त्यांचा विश्वास नव्हता. कुठलाही पारंपरिक धर्म ते पाळत नव्हते.
दहन केल्यामुळे ते हिंदू कसे होतात? दहनक्रियेच्या आधी किंवा नंतर कुठलाही धार्मिक विधी झाला नाही. शिवाय दहन करवून घेणारा हिंदूच असतो हे