गेलेल्या आहेत का? काळाच्या अनुषंगानं? मग आमच्या तर जास्त अडाणी असल्यामुळे, शिक्षण, पैसा नसल्यामुळे, गरिबीमुळे, घरच्या वातावरणामुळे २०० वर्षे घेतील. आणि मी नाही म्हणत का मी मरायच्या आधी सगळं होईल. असं कोणी नाही म्हणत. परंपरा चालू करायला पाहिजे. आमच्याकडे परंपरा कुठे आहे? तर सर सय्यद अहमद खान होते शिक्षणक्षेत्रामध्ये, ज्यांनी अलिगढ युनिव्हर्सिटी काढली. पण ती ज्या हेतूनं काढली तो काही साध्य झाला नाही. त्यांना असं वाटलं का, दुसऱ्या समाजाबरोबर आपला मुसलमान समाज जावा, त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं. पण त्यांचा हेतू काही साध्य झालाच नाही. अलिगढला त्यांनी वुमेन्स कॉलेज काढलं. तिथं महिला आहेत. शिकतात. बड्या डिग्र्या घेतात. पण तिथं सुद्धा त्या महिला चार भिंतींच्या आतच आहेत. तिथून बाहेर पडलेल्याच नाहीत. बाहेरचं जग त्यांना माहितीच नाहीये. त्यांना गरज पण नाहीये. नसीमा अन्सारी सोशल वर्कर. आम्ही तिला भेटलो होतो ना, तिनं हे सगळं सांगितलं. तिनं हे आम्हांला दाखवलं नेऊन. शिक्षण मिळालं तरी वृत्ती बदलली नाही.
आम्ही जे काम करतो ना, ते लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. आमची मुस्लिम सत्यशोधक संघटना ही विचारावर चालणारी आहे. मेजॉरिटीवर, संख्येवर चालणारी नाही. त्यामुळे आमच्या मागे संख्या नसणारच. घरातली चार माणसं तरी एकाच विचाराची असतात का? आपली मुलं तरी आपल्या विचारांची असतात का? मग परक्यांना जमा करायचं, त्यांचे विचार बदलायचे, सोपं काम नसतं. बरं, याच्यात त्यांना काही पैसा मिळणार आहे का? इलेक्शन आहे, ५-५ रुपये दिले, माझ्या नावावर व्होट टाक म्हणून? तसं नाहीये. त्यामुळं विचारांनी आपल्या मागं येणारी पाच माणसं जरी असली तरी ती माणसं आपण शिकवू शकलो याचं समाधान आम्हांला आहे. त्यामुळे आमच्या मागे खूप संख्या नाही. पण काम आम्ही केलेलं आहे. एखाद्या वेळेस दलवाई असते तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती. आम्ही पुरे पडू शकलो नाही, का तर त्यांच्या सारखं डोकं पण आमच्याजवळ नाही. हुशारी नाही. शिक्षण त्यांच्याजवळ खूप नव्हतं. फर्स्ट इयर पर्यंत शिकले होते. पण वाचन खूप होतं. माहिती खूप होती. मुसलमान लोकं म्हणायचे डिग्री होल्डर आहे का तो? तो ग्रॅज्युएट आहे का? त्याला काय आहे ऑथॉरिटी आमच्यावर बोलायची? पण ते अपुरे पढायचे नाहीत. दलवाईंना धार्मिक शिक्षण पण खूप होतं. नमाज कसे पडायचे माहिती होतं. कुराण सगळं वाचलेलं होतं. कुराणामध्ये कुठल्या आयतीत काय आहे हे दलवाई बोलत
मी भरून पावले आहे : १९९