पान:मी भरून पावले आहे.pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आसऱ्यानं. तू मुलगी सोडलीस तर ही वाईट कामाला लागेल. मग आपण बोलतो का बायका वाईट आहेत. ऐन वेळेला समजा त्यांना कसलाच सपोर्ट मिळाला नाही तर कुठली जागा आहे? पोट तर भरायला पाहिजे नं? तर सगळ्या बायका काय तिथं वाईट अर्थानं जात नाहीत. आपण त्यांना जायला भाग पाडतो, म्हणून त्या तसं करतात. मग ती पळून मुलं सोडून आली. नवऱ्यानं सांगितलं, 'तुला घरात घेणार नाही.' म्हटलं जाऊ दे. मुलं पण आणू नकोस. तू इथं आता एकटीच रहा. तिच्या आईकडे मशीन होती. त्यामुळं मशीनवर शिलाईचं काम घेऊन ती करत होती. बरं, आपली मुलं तिथं आहेत, तो चांगला सांभाळत असेल की नाही, हा विचार सुद्धा बाईला टॉर्चर करतो. सोपं नाही. आता बायकांना मी हेच सांगते. चार-चार मुलं घेऊन तुम्ही बाहेर पडता तर पडताच कशाला? त्यालाच बाहेर काढा. नाहीतर तुम्ही बेघर होता आणि त्याला घर मिळाल्यामुळे दुसरी बायको सोपेपणानं आत येते. तुम्ही आता मुलांना सोडून या. म्हणजे दुसरी बायको जी घरात येणारी असेल ती काय म्हणेल? ही चार मुलं कोण सांभाळणार? पहिल्यांदा मुलांची व्यवस्था करा. त्यानं तिच्याजवळ आणून टाकली म्हणजे? तो प्रश्न वेगळा आहे. हा वेगळा आहे. तसे पण करणारे असतात. आई सोडून देईल का मुलांना? नवऱ्यानं सोडलं तरी? मग काय मार्ग काढणार तुम्ही? त्यांच्यावर बेततंय हे मी बघते. माझ्यावर बेतलेलं नाहीये. माझा मार्ग मी कसा ठरवते? आपण एक ट्रायल घेतो ना, असं केलं तर होईल का, तसं केलं तर होईल का? तसं सगळ्यांना काही एकच लॉजिक लावून चालणार नाहीये. वेगळ्या वेगळ्या तहांनी प्रत्येकाचेच प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजेत. हे झालं. मग आम्ही काय केलं? तिथल्या बायकांचा जो ग्रूप होता त्याच्यात दोन मशिनी आम्हांला मिळाल्या होत्या. पवारवहिनींच्या हातच्या चांगल्या दोन मेरिटच्या मशिनी आम्हाला मिळाल्या होत्या. तर मी त्या ग्रूपमध्ये मशीन दिली. त्यांना सांगितलं की तुम्ही शिवणकाम करा. घरात. त्यांच्या झोपड्यांमध्येच. जागा कुठून मिळवणार? मला स्वतःला जागा नव्हती राहायला. माझ्या दोन खोल्या एवढ्या लहान आहेत की तिथं मी एक मशीनही ठेवू शकत नाही. मी तिथं क्लास कशी घेणार? नि दुसऱ्या कुणाच्या घरात कशी घेणार? तर त्यांच्यातल्या ज्यांनी सांगितलं की आमच्या घरात ठेवा, त्यांच्या घरात ठेवल्या मशिनी. एका बाईंचं घर जरा मोठं होतं. ती सांगायची की इथं मीटिंगा घ्या, तिथं मी घ्यायची. चहा करायची. मी म्हणायची की दूध, चहा, साखरेचे हे पैसे घे नि सगळ्यांसाठी चहा कर. १०-१५ बायका यायच्या, घरचे

१९६ : मी भरून पावले आहे