पान:मी भरून पावले आहे.pdf/210

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बायका. आम्ही कुठून नोकरी देणार? आम्ही पुरे पडलो नाही त्यांना. आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकलो नाही.

 शहाबानू केस झाली नि आमच्या बायकांचं नुकसानच झालं. मुस्लिम महिला विधेयक पास करून आमच्या बायकांना वक्फ बोर्डाच्या स्वाधीन केलं. पण वक्फ बोर्ड कुठे आहे? मराठवाड्याला एक आहे असं बोलतात. पण ते चालत नाही. वक्फ बोर्डकडे पैसा पण नाही आणि जो असेल तो मशिदींची डागडुजी वगैरेंसाठी खर्च केला जातो. पैसा असला तरी तो बायकांसाठी कशाला देतील? ते तर म्हणतातच का हे धर्माच्या विरुद्धच आहे. मग ते मदत कशी करणार? धर्म पाळणाऱ्या बायकांना तरी ते मदत करतात का? ते म्हणतात, अशा केसेस नाहीतच. एखादीच असेल. त्यांनी येऊन आमच्याकडे बघितलं असतं तर त्यांना कळलं असतं ना त्या केसेस काय आहेत? आणखीन एका बाईची केस. तिनं नवऱ्याला कोर्टामध्ये खेचलं. तिला पहिली मुलगी होती. तो नांदवत नव्हता बरोबर. मारायचा, झोडायचा, टाकायचा, त्रास द्यायचा. ती कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आली. कोर्ट केस झाली. त्याला एकदा-दोनदा बोलवण्यात आल्यामुळे त्याचे डोळे उघडले. तर मी त्या मुलीला सांगितलं तू बोलव नवऱ्याला माझ्याकडे. आल्यानंतर समजूत घातली. तो म्हणाला, 'मी नांदवेन.' तर म्हटलं, 'आम्हांला केसेस चालवून नवरे सोडायला लावायचे नाहीयेत. आम्हांला काँप्रमाइझ करून संसार कसे चालतात तुमचे हे पाहायचंय.' मग हिला आत नेऊन मी सांगितलं. बघ शेजारीपाजारी ओळख काढ. मित्र-मैत्रिणी कर. त्यांच्या थ्रू मला पत्र पाठव. म्हणजे मला कळेल त्या घरामध्ये काय आहे. त्या घरामध्ये गोषा, पडदा लावलेला आहे. मुलींनी संडासात जाताना सुद्धा एकटं जायचं नाही. बाजूला संडास असला तरी सासू बरोबर जाणार. नणंद बरोबर जाणार. घरात हिला मारहाण व्हायची. आई नि भाऊ येऊन रडायचे की आम्हांला तिथं गेलो ना, तर थारा नसतो. मुलीशी मोकळेपणानं बोलता येत नाही. इथं सासू बसलेली आहे, इथं मुलगी बसलेली आहे. काय ती मुलगी बोलणार? त्यामुळे तिला भयंकर त्रास दिला. एक-दोन वर्षं खूप रडली आणि त्यात ती परत प्रेग्नंट राहिली. बरं असंही नाही, की हिला कोण सांभाळणार? आई चांगली होती. भाऊ चांगला होता. दोघेही सांभाळायला तयार होते. काही जमलं नाही. दुसरी मुलगी झाल्यावर खूप त्रास झाला. तेव्हा मी तिला सांगितलं का तू त्यांच्याकडं राहातेस कशाला? तुला शिवणकाम येतं. मग तू तिथं राहू नको. ती तिथून पळून आली. आईला समजून सांगितलं का तू हिला ठेव

मी भरून पावले आहे : १९५