पान:मी भरून पावले आहे.pdf/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सांगितलं की बाबा तुम्ही आता धंदा करा. काहीही करा. मला ती खूप मान देतात मुलं. लैला सांगत होती, 'ममा, आमच्या घरात कॅलेंडर नाही. पण हमीदभाईंचा एक फोटो आहे. राष्ट्र सेवा दलाच्या कॅलेंडरवरचा. माझ्या मुलांनी तो फ्रेम करून लावलाय आणि सांगितलंय का या घरात दलवाईंशिवाय कोणाचाही फोटो लावायचा नाही. निदान तो एवढं तरी तुम्हाला मानतो.' आणि प्रोग्रॅम असला का त्याला मदत करतो. काहीही काम सांगितलं का नाही म्हणत नाही. उलट, ‘आपा, तुम बैठो, तुम कुछ नही करनेका, हमको बोलो', असं म्हणतात. ही लैलाच आता इतर बायकांना समजावून सांगते, आमच्याकडे यायला सांगते. म्हणजे हीच कार्यकर्ती झाली. सगळे तिला म्हणतात की आपांनी तुझं भलं केलं. तर ती म्हणते, 'तुम्ही पण जा. तुम्ही तिला सांगा. म्हणजे ती तुमच्यासाठीही येईल. तुम्हांला घरी बसून सगळा फायदा पाहिजे.'

 प्रत्येक प्रोग्रॅम जेव्हा असायचा ना, तेव्हा सारखं सारखं जायचं नि बायकांना बोलवायचं काम माझं. पूर्वी माझ्या दोन्ही मुली हे काम करायच्या. समजा हॉल घेतला. बायकांना प्रोग्रॅमला आणायचं असेल तर एकदा बोलावून चालायचं नाही. दोन-तीन-चार खेपा जाऊन मी आमंत्रणं देऊन यायची. नंतर माझ्या मुली इला नि रुबीना, दोघी जाऊन बायकांना तयार करून, हात धरून हॉलमध्ये आणण्यापासून परत नेण्यापर्यंत जबाबदारी घ्यायच्या. तेव्हा तिथं एवढ्या मोठ्या संख्येनं बायका यायच्या. पण माझ्या मुली नंतर म्हणायला लागल्या, 'बाप रे, तुझा एक कार्यक्रम म्हणजे आमची कंबर ढिली होते. आम्ही आमचं करिअर करायचं का नाही, संसार करायचा का नाही? का तुझंच काम करायचं?' तर सुरुवातीला मुलींची मला भरपूर मदत व्हायची, लिहिण्याच्या कामात. विशेषतः मराठीमध्ये लिहिणं सोपं पडायचं. बातमी लिहून देणं. बायकांना आणणं. ही कामं त्या करायच्या. विद्याविकास नावाची शाळा होती. तिथं शेख म्हणून एक प्रिन्सिपॉल होते. ते आमच्या विचारांचेच होते - पण बिचारे किती मुसलमान असे आहेत जे आमच्या विचारांचेच असून खुल्या मनाने आम्हांला मदत करू शकत नाहीत - तर ते म्हणायचे का तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या एक-दोन मुलांना दर वर्षाला अॅडमिशन मिळेल. अशा तऱ्हेने आमच्या एखाद्या मुलाला वर्षातून एकदा अॅडमिशन मिळायची. चांगला मुलगा आहे, मुलगी आहे. हुशार आहे. मुलींकडं मुलांपेक्षा आम्ही जास्त लक्ष दिलं नि नंतर नंतर काय झालं? तर हा आमचा मुलगा आहे, उनाड आहे, काम करत नाही. याला नोकरी द्या, अशी गळ घालायला लागल्या

१९४ : मी भरून पावले आहे