पान:मी भरून पावले आहे.pdf/205

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हती. मी कोण आहे, हेही त्याला माहीत नसावं. मीटिंग सुरू झाली. हा तरुण उठला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. तो मुसलमानांना उद्देशून बोलत होता. 'ही लोकं काय समजतात स्वतःला? आमच्याकडे आले पाहिजे होते. आमचे पाय धरायला हवे होते, आमच्याशी आपल्या जीवनाची भीक मागायला हवी होती.' दमबाजीने तो बोलत होता. वाटेल ते बकत होता. लोकं त्याला घाबरून गप्प बसली होती. तो काय बोलत होता, त्याचं त्यालाच कळत नसावं. त्याचे बोलणे संपल्यावर दुसरं कोणी उठत नाही असं बघून मी उठले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कैक वर्ष इथे राहत आहात, एकमेकांशी तुमचे संबंधही चांगले आहेत. एका ताटात तुम्ही खाता, एकमेकांच्या सुख-दुःखात उपयोगी पडता, मग आता एकदम काय झालं? वरून आदेश आला म्हणून काय झालं? आपण आपलं डोकं शाबूत ठेवून विचार करावा आणि मग काय ते ठरवावं. मी आदेश हा शब्द उच्चारला आणि भडका उडाला. सगळे शिवसैनिक तुटून पडले, वाटेल ते बोलायला लागले. मग माझ्या लक्षात आलं की हा शब्द बाळासाहेब ठाकरेंचा आहे, मी थोडं स्वतःला सावरून घेतले आणि म्हणाले, मी हा शब्द त्यांच्या संदर्भात वापरलेला नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश असा होता की, आमच्या वर जी विद्वान मंडळी बसली आहेत, ती अशी आदेश देतात. त्यांचं काय जातं? त्यांची घरं जाळली जात नाहीत. त्यांना मार खावा लागत नाही. पण आपल्यासारख्या गरिबांची मात्र वाट लागते. आताच पहा ना कोणाचं नुकसान झालं ते? कोण बेघर झालं आहे? आपण याचा विचार करणार आहोत की नाही? खरं म्हटलं तर माझं तिथलं येणं कोणाला आवडलं नव्हतं. जे ओळखत नव्हते त्यांनी मुसाला विचारले ह्या कोण आहेत? मुसा म्हणाला, “ह्या मुस्लिम सत्यशोधक मंडळा'च्या कार्याध्यक्षा आहेत. आमची माहिती घेण्यासाठी आल्या आहेत. मी त्यांना असंही सांगितलं, तुम्ही बाळासाहेबांना विचारा, मी कोण आहे? मग मी तिथून उठून आले. मुसाने मला घरापर्यंत आणून सोडलं, आणि म्हणाला, “तुम्ही आता बाहेर पडू नका. आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही." मग शहाजहाँ, लैला मला सारखे दोन-दोन दिवसांनी येऊन बातम्या देऊ लागले. इलाला भेटले, ती म्हणाली, आम्ही अंधेरीलाच होतो. पण वातावरण फार भीतीचं होते. एकदा तर मागच्या बाजूला रात्री १२-१ च्या सुमारास १००-२०० माणसं हातात मशाली, लाठ्या-काठ्या घेऊन धावताना पाहिलं. असं वाटलं, खिडकी फोडून ते घरात शिरतात की काय? त्या दिवशी मी व महेशने रात्र बसून काढली. भीतीनं मी रडायला लागले. लहानपणापासून मुंबईत अशी परिस्थिती

१९० : मी भरून पावले आहे