पान:मी भरून पावले आहे.pdf/204

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अडकून रहावं लागलं. शेवटी १४ डिसेंबरला रात्रीच्या ११ वाजता एशियाडने मी मुंबईला आले. गाडीत फक्त ८ ते १० पॅसेंजर होते. सकाळी साडेचारच्या सुमारास दादर टी.टी. येथे एशियाड थांबली. खूप काळोख होता. रस्त्यावर कुत्रंसुद्धा दिसत नव्हतं. माझ्याबरोबर २-३ पॅसेंजर उतरले. आणि कुठे तरी नाहीसे झाले. मी एकटीच होते. दाऊदच्या दुकानाला लागलेली आग लांबूनसुद्धा दिसत होती. मी कसंबसं रेल्वेस्टेशन गाठलं. विरार गाडी लागली होती. पण मूठभर पॅसेंजर दिसले. गाड्या बरोबर चालत नव्हत्या. पाच नंतरची गाडी मिळाली. मी पुरुषांच्या डब्यात चढले. पण सबंध डब्यात ४-५ पॅसेंजर होते. मी अंधेरीला उतरले. पुलावरून खाली गल्लीत आले. पाहिलं तर दोन्ही बाजूंची दुकानं जळून खाक झालेली होती. आग धुमसत होती. आणि एकही माणस रस्त्यावर दिसत नव्हता. माझी काॅॅलनी जवळच होती. मी कशीबशी घरी आले. सगळीकडे सामसूम होती. सकाळी शेजारी-पाजाऱ्यांची चौकशी केली. बाजूवाली म्हणाली, तुमची इला इथेच होती. कधी गेली आम्हांला कळलंच नाही. मी दुसऱ्या दिवशी १४ तारखेला अंधेरी वेस्टला आंबोली व्हिलेजमध्ये गेले. तिथे आमच्या मंडळाचा एक ग्रूप रहात होता. १५-२० वर्ष माझं तिथे जाणं-येणं होतं. तिथल्या बऱ्याच लोकांना मी ओळखत होते. आमच्या मंडळाचे मुसा, इस्माईल, महमुदभाई, हसेनभाई, इक्बाल आणि त्यांच्या घरातील बायका, आम्ही प्रोग्रामच्या निमित्ताने भेटत असू. तिथे सेवादलाची काही मंडळी आहेत. तीसुद्धा नेहमी भेटणारी. दंगलीमध्ये या सगळ्यांचं काय झाल असेल, हे पाहण्यासाठी मी संध्याकाळी ५ च्या सुमारास तिथे गेले. मुसाच्या घरी आले. हा आमचा मुख्य कार्यकर्ता आहे. तिथे पाहाते तो काय, घरची लोक सामान बांधून गावी जाण्यासाठी तयार बसलेत. मला पाहून मुसाची आई म्हणाली, तुम्ही कशाला आलात? इथलं वातावरण अजिबात चांगलं नाही. मी विचारलं, मुसा कोठे गेला? ती म्हणाली, येथे शिवसेनावाल्यांनी मीटिंग ठेवली आहे. तो तिथे गेला आहे. मी त्याला बोलावलं. तो आल्यावर त्याला मी म्हणाले, तू मला त्या मीटिंगला नेे. मी बघते काय करायचं ते. आम्ही तिथे गेलो, खूप लोकं जमा झाली होती. चार-पाच खुर्च्या ठेवल्या होत्या. वर कोणीच बसायला मागत नाही. एका खुर्चीवर एक मुलगासा, गलिच्छ कपड्यात बसलेला दिसला. केस वाढलेले, दाढी बऱ्याच दिवस न काढलेली, भाषा तर भयंकर. कुठल्याही सभ्य लोकांशी संबंध नसलेला असा एक तरुण मी तिथे पाहिला. हा कोण होता, शिवसेनेचा शाखाप्रमुख. मी त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं. पण कधी पाहण्याची किंवा बोलण्याची संधी मिळाली

मी भरून पावले आहे : १८९