पान:मी भरून पावले आहे.pdf/202

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळं व्हिजिलन्स खात्यात झालं. हे होत असताना तिथे आर.यू.चंद्रचूड हे डायरेक्टर आले. ते मला व दलवाईंना ओळखत होते. केस बघितली आणि मला बोलावलं. विचारलं, तुम्ही किती दिवस इथे काम करता? मी म्हणाले, जवळ जवळ २५ वर्षं. 'हा फ्लॅट कितीचा आहे ?' '२८००० रुपयांचा.' इतक्या वर्षांत इतकी बचत होऊ शकत नाही का? मग मला मेमो देऊन इतकं हैराण करण्याची काय गरज होती?' मी विचारलं. ते हसले आणि म्हणाले दलवाई बाई, आपल्या पैशाचा खराखुरा हिशोब कोणालाही कधीच द्यायचा नसतो. लाख दोन लाखाची बाब असती तर प्रश्न वेगळा होता. पुढे लक्षात ठेवा. आणि त्यांनी ती केस बंद केली. मी दलवाईंच्या इस्लामिक रीसर्च सेंटरसाठी या घराचा हॉल व दलवाईंची सगळी पुस्तकं देऊ केली आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे हे सेंटर चालवण्यात येणार आहे.

 दुसरी गोष्ट अशी की आमच्या घरामध्ये फार धार्मिक वातावरण नव्हतं. सुरुवातीला मी कधीतरी म्हणजे ईदेबिदेला नमाज पढायची, शिरखुर्मा करायची. नवे कपडे वगैरे घालायची. ईद साजरी करायची. नंतर आमच्या मुली गेल्या होस्टेलमध्ये. हे नसायचे. हे दौऱ्यावर. मग एकट्याने कशी ईद करायची? म्हणून हळूहळू ईद पण बंद झाली. मुलींना होस्टेलवर ठेवल्यावर मलासुद्धा ईद करणं जड जायला लागलं. शिरखुर्मा खाताना आठवण यायची मुलींची. तेव्हा मी यांना सांगितलं का, मुली घरात असतील तर शिरखुर्मा, ईद वगैरे. नाही तर नाही. काही करणार नाही मी. हे म्हणाले, 'ठीकय. तुझा संसार आहे नं? तू म्हणशील तसं. मला काही नाही.' पण मुली आल्यानंतर ते म्हणायचे, चला, आता मुली आलेल्या आहेत. शिरखुर्मा खायचा. मग आम्ही दोन-चार वेळेला सुद्धा खात असू. त्या वेळी ईद आमची. पण दलवाई गेल्यानंतर मी घरात ईद करायची नाही असं ठरवलं. का ठरवलं सांगते. कारण प्रत्येक ईदला मुली घरात असतातच असं नाही. पण महिलांमध्ये मी जेव्हा काम करायला लागले, तेव्हा ईदच्या दिवशी मी त्या महिलांच्या घरी जायची. कोणी आजारी असे त्यांच्याकडे जायची आणि त्यांनी शिरखुर्मा वगैरे केलेला असायचा. त्या म्हणायच्या, आपा आयी. अन एका प्याल्यामध्ये चार चमचे ठेवायच्या आणि सगळ्या घरातल्या लोकांनी एकेक चमचा खायचा. त्यांच्याबरोबर मी खायची आणि अशा रीतीने त्या बायकांबरोबर मी ईद मनवून यायची. ही प्रथा मी अजून चालू ठेवलेली आहे. त्यामुळे काही घरांत काही केलेलं नसलं तरी ती लोकं म्हणायची, 'नही, आपा आएगी. बोलेगी ना, की मेरे

मी भरून पावले आहे : १८७