पान:मी भरून पावले आहे.pdf/201

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचारलं. सय्यदभाई म्हणाले, आपण एखादा फ्लॅट भाबींच्या नावावर घेऊ या. ते हसले, आणि म्हणाले हे कसं शक्य आहे? इथे खाण्याचे वांधे आणि म्हणे घर घेऊ या. पण सय्यदभाईंनी त्यांची पाठ सोडली नाही. अतुर संगतानी दलवाईंना चागंले ओळखत होते. त्यांनी सुद्धा दलवाईंची खूप समजूत घातली. फ्लॅट घ्यायचं ठरलं. ५०० स्क्वेअर फूटची जागा २ रूम किचन, जवळ जवळ २८००० पर्यंत पडेल. पूलगेटजवळ कृष्णकुंजमध्ये. पाचव्या मजल्यावर, लिफ्टची सोय होईल. सारं ठरलं. पहिला हप्ता ५००० रुपयांचा होता. कुठून तरी कर्ज घ्यायचं असं ठरलं. काही ठिकाणी गेलो पण जमलं नाही. मी आमच्या आत्याकडे गेले. तिची परिस्थिती चांगली होती. पण ती म्हणाली, हमीदला काही कळत नाही. इतक्या घाणेरड्या वस्तीत ती जागा आहे. आणि पाचवा मजला म्हणजे काय? घेऊ नको त्याला सांगा. अशा रीतीने तिने ते पैसे नाकारले. या पैशाची व्यवस्था सय्यदभाईंनी केली. ५-६ वर्षांमध्ये हजार, पाचशे करून इकडून तिकडून घेऊन पुढचे पैसे देण्यात आले. शेवटचे पुन्हा ५००० भरायचे होते. माझ्या मामेभावाने- अर्शद याने आपल्या मित्राकडून घेऊन दिले आणि सांगितलं, पैसे फिटेपर्यंत तो इथेच राहील. आम्ही ते मान्य केलं. यांच्या किडनीच्या ऑपरेशननंतर आम्ही दोघे पुण्याला गेलो असता त्या घरात गेलो. मित्र आम्हाला भेटला. तो खूष झाला आणि त्याने आपल्या बायकोला सांगितलं, 'बघ, घराची मालकीण आली आहे. तिने बिचारीने आपलं घरही अजून पाहिलं नाही. तू तिला आत ने आणि घर दाखव.' मी पाहिलं, खूपच चांगलं वाटलं. तीन खोल्या. जेमतेम दोन खोल्यांत राहिलेली आम्ही माणसं, हा आमच्यासारख्यांना स्वर्गच की. मित्र म्हणाला, 'हमीदभाईंना बरं नाही, तुम्हाला वाटलं तर आम्ही घर रिकामे करतो. पैशाची काळजी करू नका. तुम्ही इथेच येऊन रहा.' आमची त्याच्याशी फारशी ओळख नसतानासुद्धा त्याने असं सांगावं, धन्य वाटलं. आम्ही म्हणालो, डॉक्टर मुंबईचे आहेत. येथे राहून चालणार नाही. पैसे फिटेपर्यंत तुम्हीच रहा.

दलवाई गेल्यानंतर ते घर हातात आलं. आम्ही त्या घरात जाऊ शकलो नाही. मी ऑफिसात रिझ्यूम झाले, पहिलं काम केलं, माझी ही पुण्याची प्रॉपर्टी आहे हे मी डिक्लेअर केले. सगळ्या मित्रमंडळींनी मला मूर्खात काढलं. पण मी दुर्लक्ष केलं. ऑफिसमध्ये यासाठी मला त्रास देण्यात आला. माझी चौकशी करण्यात आली, की मी इतका पैसा कुठून आणला, कोणाकडून आणला. रिसीट वगैरे दाखवाव्या लागल्या. त्या त्या लोकांकडे जाऊन विचारपूस करण्यात आली. हे

१८६ : मी भरून पावले आहे