Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी, श्रीगोंद्याचे समीर मणियार आणि फलटणचे विलायत शेख ही मंडळी शिकलेली त्यामुळे मंडळाच्या कामाला जोर आला आहे. वजीर पटेल हे आमचे खूप जुने कार्यकर्ते. अमरावतीला फॅमिली प्लॅनिंगचं काम खूप जोरात चाललंय. असं जे म्हटलं जातं की मुसलमानांमध्ये फॅमिली प्लॅनिंग होतच नाही, हे खरं नाही हे वजीर पटेल यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. हाही माणूस दलवाईंचा खूप जवळचा होता.
 आमच्या लक्षात आलं की काही मुसलमान शहाबानूवर केस मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आणि सरकार ‘मुस्लिम महिला विधेयक' पास करणार अशीही बातमी आमच्या कानावर आली. आम्ही बेचैन झालो. तलाकमुक्ती मोर्चामधील काही माणसं, इतर काही लोक आणि तलाकपीडित महिला घेऊन आम्ही दिल्लीला आलो. तिथे प्रमिलाताई दंडवते यांनी आम्हांला खूप मदत केली. त्यांच्याच मदतीमुळे आम्ही पंतप्रधान राजीव गांधींना भेटलो. ते म्हणाले, 'आप अपने मुल्ला-मौलवीयोंसे मिले, उनसे बातचीत करे, अपने समाजको अपने साथ लाये, जब तक वो आपके साथ नहीं आते हम कुछ नहीं कर सकते.'
 समाजसुधारकांच्या मागे समाज कधीच नसतो हे फक्त आम्हांलाच माहीत होतं!

 मग आम्ही राष्ट्रपती झैलसिंगजींना भेटलो. त्यांनी आमची चांगली विचारपूस केली. तलाकपीडित महिलांची दुःखं ऐकून घेतली. मग ते म्हणाले, 'आप बिलकुल फिकर न करे, मैं सब लोगोंको समझाऊंगा, आपने बहुत अच्छा सवाल हाथमे लिया है.' त्याच वेळी आम्ही इतर काही लोकांनाही भेटलो. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते विधेयक पास झालं आणि आमच्या बायकांची दुर्दशा झाली. ह्यामुळे आमची चळवळ १०० वर्षं मागे गेली. दलवाई नव्हते त्या वेळी. डिसीजन घेणारे मी नि जमादारच होतो नं. आमच्या बरोबरची जी माणसं होती ती सुद्धा खूप बोल्ड होती. बाबूमियाँ इतके म्हातारे तरी सुद्धा त्यांना जरादेखील घाबरलेलं मी बघितलं नाही. बायका आल्या होत्या बरोबर. जे पुरुष होते त्यांनी पण आम्हांला रस्त्यावर त्रास नाही दिला. नऊ महिन्यांचा तो मुलगा सुद्धा रडला नाही, दिवसभर त्याला दूध नाही मिळालं तरी. तेव्हा माझ्या मनात एक विचार असा घोळत राहिला की आपण देवाला मानत नाही. म्हणजे धर्माचं काही करत नाही. नमाज पढत नाही. रोजे ठेवत नाही. काही लोक अल्ला, ख़ुदा, देव-देव करतात तसं आपण करत नाही. मंदिर-मस्जिदमध्ये जात नाही. आपण नास्तिक आहोत

१८४ : मी भरून पावले आहे