पान:मी भरून पावले आहे.pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहून घेत होते, वाचत होते. तिथे एक-दोनदा वाचलं का तर स्टेजवर गेल्यावर मला नर्व्हसनेस यायचा ना. बोलायचं कसं? मला सगळ्यांनी सांगितलं, 'नाही नाही भाभी, तुम्ही बोलता छान. वाचता ते बरोबर नाही वाटत. बोला ना तुम्ही. मुद्दे माहिती असतात ना तुम्हाला? मांडा नं तुम्ही. का नाही मांडत?' तर मी म्हटलं, मग ठरवू या असं की मी जे मुद्दे मांडणार आहे ते तुम्ही मांडायचे नाहीत. तुम्ही जे मांडणार ते मी मांडणार नाही. सगळ्यांनी आधी बोलून सगळे मुद्दे संपतात. बोलायला मला काही उरत नाही. तसं नाही करायचं. मी पहिल्यांदा बोलणार पण नाही. असं ठरवल्यानंतर माझे मुद्दे कोणीच बोलायचं नाही. अशा रीतीनं मॉबसमोर स्टेजवर कसं बोलायचं ही गोष्ट मी शिकले. दुसरं असं की मोर्चा म्हणजे काय माहिती नव्हतं. प्रोग्रॅम म्हणजे काय समजत नव्हतं. त्या वेळी मी बाहेर पडले तर बाहेरचं वातावरण, बाहेरचं पब्लिक, बाहेरची लोकं पाहिली. प्रोग्रॅम करताना काय काय अडचणी येतात हे सगळं माझ्या लक्षात आलं. आणखी एक, भीती कमी झाली लोकांची. मॉब असा अंगावर यायला लागला की भीती वाटायची. नाही असं नाही. कारण मी काही इतकी बोल्ड नव्हते. पण लोकांना कनव्हिन्स करायचं असेल तर आपण भिऊन चालत नाही. तेव्हा असंही वाटलं का एवढ्या गडबडीमध्ये आपल्यावर एखादी काठी-लाठी पडली असती तर आपण जास्त हुशार झालो असतो, मजबूत झालो असतो आणि आपल्याला लोकांची जरासुद्धा भीती वाटली नसती. या गोष्टी मी त्या मोर्चामध्ये शिकले. काय तो दोन-तीन महिन्यांचा काळ गाजलाय! आम्हांला ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्यांनी सांगितलं की हे तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. तो मोर्चा खूप सक्सेसफुल असा झाला. कोणी म्हणाले, '१९६६ साली ७ महिलांचा मोर्चा गेला होता. त्यानंतर हा हिस्टॉरिकल मोर्चा म्हणायला हरकत नाही.' अशा रीतीने तो मोर्चा ८५ साली पार पडला.
 या मुक्ति मोर्चाहून परत आल्यावर. सी.आर.दळवींनी- हाय कोर्टात वकिली करतात- मला आपल्या ऑफिसात बोलावून सगळ्यांशी ओळख करून दिली. आणि या मोर्चामध्ये मी काय कामगिरी केली याचं वर्णन करून माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या लीगल अॅडवाईजचा मला वारंवार फायदा झालेला आहे. ते इंडियन सेक्युलर सोसायटीमध्ये दलवाईंच्या बरोबर होते.

 मुक्ति मोर्चाच्या वेळी आमच्या बरोबर असलेले नवीन कार्यकर्ते फार जोमाने कार्य करत आहेत. कोल्हापूरचे काझी, निपाणीचे बेग व नाईक, शामकाका (पटवर्धन) हे राष्ट्र सेवादलातील, मुक्तिमोर्चात आमच्याबरोबर होते. पुण्याचे

मी भरून पावले आहे : १८३