पान:मी भरून पावले आहे.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नमाज संपली की सगळे एकमेकांना असे मिठी मारायचे ना, तर त्यांना ते आवडायचं नाही. ते मागच्या मागे निघून घरी यायचे आणि आमची आई अशी संतापायची; म्हणायची, की तुझ्या बापाला अक्कलच नाही. चार माणसांमध्ये मिक्स व्हायला नको. ते म्हणायचे, “मला हा सगळा प्रकार आवडत नाही. काय भेटायचंय? मला नमाज पढता येत नाही. लोकं पढतात तसं मी पढलो. तू म्हणाली म्हणून मी तिथं गेलो. नाही तर मी जाणार पण नाही." आमचे वडील थोडे संकोची होते. त्यामुळे ते जास्त माणसांत जायचे नाहीत, बोलायचे नाहीत आणि काय व्हायचं? आम्ही तर त्यांच्या मुलीच. पण त्यांचं कधी डोकं दुखलं ना तर त्यांनी मुलींना कधी सांगितलं नाही की माझं डोकं चेपा म्हणून. म्हणायचे, “नको नको, तू चेपू नको. तुझ्या आईला बोलाव.” मी मोठी होते ना घरात. मी वडिलांची लाडकी पण होते. त्यामुळे मला असं वाटायचं की ह्यांचं डोकं दुखतंय, आपण चेपावं. ते म्हणायचे, "नको बाबा, तू नको चेपू. आई चेपेल." म्हणजे इतके ते बायकांपासून बाजूला राहायचे. माझ्या वडिलांना पिक्चरचा शौक होता पण कधी पिक्चरला जात नसत ते. आम्हांला जाऊ द्यायचे. दर रविवारी आम्ही पिक्चरला जायचो. मला गोष्ट सांगायची खूप आवड होती. पिक्चर मी बघून आले की माझे वडील विचारायचे, तू काय बघितलंस?' पिक्चरचं वर्णन मी करीत असे. त्याच्यात गाणी कशी झाली, प्रेमाच्या गोष्टी कसे बोलले, डायलॉग कसे होते, सिनरी कशी होती, त्याची थीम काय होती, ते कसे अॅक्शन करत होते हे सगळं शब्दांत रंगून बोलण्याची मला सवय होती. माझी एक बहीण होती दौलत नावाची. तिला तर झोपताना रोज त्रास द्यायची. मी गोष्ट सांगायची आणि ती कधी झोपायची ते कळायचं पण नाही. आणि आजही तिनं विषय काढला तर ती म्हणते सुद्धा की ही फार बोअर करायची मला. मला कंटाळा यायचा आणि हिची गोष्ट काय संपायचीच नाही. लांबच्या लांब चेहऱ्याने ती काय आणि कसं बोलायची हे मला कळत पण नसे. अर्थात् तेव्हा वडिलांकडे मी राहात नव्हते. दिवाळीची सुट्टी आली, दसऱ्याची सुट्टी आली की मी त्यांच्याकडे जात असे. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले तेव्हा मला माहिती पण नव्हतं, माझी आई कोण, माझे वडील कोण.

 पहिल्यांदा म्हणजे मी ४ थी - ५ वीत वगैरे असेन तेव्हा, कधी तरी वडील लाडात आले की पैसे द्यायचे, आमच्या आईला किंवा आमच्या आजीला की हिला कपडे घ्या, हिला ते घ्या म्हणून. एकदा त्यांनी मला मुंबईला घरी आणलं, त्या वेळी आम्ही कुर्ल्याला राहात होतो वडिलांनी मला आणलं,

४ : मी भरून पावले आहे