Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा मुद्दा घेऊन त्या चौघीच्या चौघी उठून भांडायला लागल्या. त्या सगळ्या शिकलेल्या होत्या. सगळ्या प्रिन्सिपॉल्सची ती सभा. सामान्य माणसं नाहीत. अशिक्षित असायचा काय प्रश्न आहे? आणि त्या असं बोलायला लागल्या. इतका गोंगाट केला त्यांनी, की आवरायला कठीण गेलं. मला बोलायला दिलंच नाही. आणि त्यांच्यातल्या जिला मी ओळखत होते ती आली, बोलायला उभी राहिली. म्हणाली की, यांनी असं असं सांगितलं ते तसं नाही. यांना मुद्दे माहीत नाहीत. यांनी सगळं चुकीचं सांगितलं आहे. आणि असं कुठेही लिहिलेलं नाही. पैगंबरांनी असं केलेलंच नाही. ही सगळी विधानं खोटी आहेत. यांना कुणीतरी खोटंच लिहून दिलेलं आहे. 'पैगंबरांची बदनामी का करतात?' असं तिने खूप वेळा सांगितल्यानंतर मी उठले आणि म्हटलं, आत्ता मी जे सुशिक्षित स्त्रियांबद्दल विधान केलं त्याचाच हा पुरावा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या बाईला बाजूला केलं. मी म्हटलं, यांना हिस्टॉरिकल फॅक्टस नको असतात, हे जे काय आहे ते खरं आहे आणि तेच मी सांगितलेलं आहे. माझ्या मनात पैगंबरांची बदनामी करायची नव्हती, बेअदबी करायची नव्हती. तुम्ही प्रश्न विचारलात त्या संदर्भात मी हे उत्तर दिलं आहे. हे सगळं झाल्यानंतर संयोजकांच्या लक्षात आलं की ह्या हुल्लडबाजीसाठीच उठलेल्या आहेत. मीटिंग पार पाडू देणार नाहीत. तेव्हा सगळ्यांनी येऊन, 'तुम्ही फार चांगलं काम करता', असं म्हणून माझ्या गळ्यात हार घातला. माझे आभार मानले. ती मीटिंग संपली. सगळे बाहेर गेले. मग जे निवडक लोक होते, ज्यांना याविषयी ऐकायचं होतं ते म्हणाले की, आपण बाजूच्या रूममध्ये चर्चा करू या. आणि आम्ही बाजूच्या रूममध्ये रूम लॉक करून चर्चा केली. हे झाल्यानंतर आम्ही घरी आलो.

 त्यानंतर दोन महिने पोलिसांच्या सी.आय.डी. डिपार्टमेंटकडून सारखे घरी फोन यायचे. नंतर उर्दू पेपरमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी दिली. त्यात त्यांनी लिहिलं की, त्या हिंदू बायका, मेहरुन्निसाबाईंसारख्या बाईला बोलवतात आणि आमच्या धर्माची बदनामी करतात. त्यांची चौकशी व्हावी. असं सगळं मी वाचलं आणि सोडून दिलं. रुबीना म्हणायची, 'सारखा फोन येतो. पण तू नसताना येतो. तू असताना येत नाही.' तर म्हटलं, 'तू त्यांना सांग की माझी आई इतका वेळ घरी असते त्या वेळेला तुम्ही फोन करा. काय काम आहे विचार.' तसं तिने सांगितल्यानंतर एक दिवस फोन आला. म्हटलं, 'काय साहेब? इतके दोन महिने तुम्ही फोन करताय. कशासाठी करत होतात?' 'नाही, तुम्हांला इकडे पोलीस

१७४ : मी भरून पावले आहे