शाळांचे सुमारे ५०-६० प्रिन्सिपॉलस्, टीचर्स यांचं दोन दिवसांचं शिबीर घेण्यात आलं. त्याच्यात प्रमिलाताई संघवी वगैरे होत्या. वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या महिला कामं करतात त्यांना त्या वेळी बोलावलं होतं. महिलांच्याकडे जास्त लक्ष होतं त्यांचं आणि त्यात पुरुष पण होते. ऐकणाऱ्यांत सगळे होते. मुस्लिम महिलांमध्ये, मुसलमान समाजामध्ये कोण काम करतं, तर दलवाईभाभी करते. त्यांच्यात असं ठरलं का आपण त्यांना बोलवू. तर तिकडे मला बोलावलं. दोन दिवसांचं शिबीर होतं. तेव्हा माझं भाषण होतं. त्या वेळी मी तिथं गेले. तिथं गेले असताना हॉल असा भरलेला होता. खाली बसले होते लोक. मला कोचावर बसायला दिलं होतं. सहज माझी नजर बाजूला गेली तर चार मुसलमान बायका वेगळा ग्रुप करून बसलेल्या होत्या. त्यातल्या एकीला मी ओळखत होते. ती एका शाळेची प्रिन्सिपॉल होती. तेव्हाच मला थोडं स्ट्राइक झालं की आज सभा काही बरोबर होणार नाही. मी प्रमिलाताईंना सांगितलं की आपण माझं भाषण नको ठेवायला. तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे बरं पडेल. त्या दिवशी मी भाषण असं लिहून नेलं नव्हतं. पण काही मुद्दे आपल्याला बोलायला पाहिजेत, ते आपल्या लक्षात राहिले पाहिजेत म्हणून एक एक वाक्य असं लिहिलेलं होतं. कागद माझ्याकडे होता. प्रश्नांना सुरुवात झाली. तर असं विचारलं की तुमच्याकडे चार लग्नं होतात, ती कशाकरिता होतात? त्याची जरा आम्हांला माहिती द्या. यावर मी माहिती दिली ती अशी की, त्या काळामध्ये पुरुष लढाईमध्ये जास्त मरत होते आणि बाई मुलांसकट विधवा व्हायची. त्यांना सांभाळायला कोणी नसायचं, तर त्यांची देखभाल कोण करणार? तसा पुरुष ठेवला तर समाज नावं ठेवायचा. मग त्यांना आसरा कसा द्यायचा? म्हणून पैगंबरसाहेबांनी ही युक्ती काढली. पण त्यांनी असंही सांगितलं होतं की लग्न करायला हरकत नाही. पण चौघींना बरोबरीचा दर्जा द्यायला हवा. असं जर होणार नसेल तर एकच बायको राहिलेली बरी. मग त्यांनी मला पैगंबरसाहेबांच्या बालविवाहासंबंधी, दत्तक घेण्याबद्दल आणि विधवाविवाहाबाबत प्रश्न विचारले. त्यांना मी आपल्या परीनं उत्तरं दिली. एक प्रश्न असा होता की तुमच्याकडे शिकलेले लोक आहेत ते तुम्हांला कसे वाटतात? तर मी म्हटलं, ते खूप कडवे धर्मवेडे असतात. त्यांच्या डोक्यामध्ये वैचारिक गोंधळ फार असतो. कुठलीही गोष्ट अशिक्षित माणसाला पटवणं सोपं जातं पण शिकलेल्या माणसाला पटवणं सोपं जात नाही. ह्या उत्तरावर त्या चारांमधली एक चिडली. तिने सांगितलं की, मेहरुन्निसाबाईंनी आम्हांला फॅनॅटिक म्हटलं. त्यांनी आमची माफी मागावी. आणि
मी भरून पावले आहे : १७३