पान:मी भरून पावले आहे.pdf/187

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दलवाई गेल्यानंतर माझीही सोय पूनम हॉटेलात केली गेली. मी दुपारच्या गाडीने पुण्याला जायची. गेल्याबरोबर शहासाहेबांना भेटून सर्व कामाचा रिपोर्ट द्यायची. पण जेव्हा शहासाहेब गेले त्या वेळी मी त्यांना भेटू शकले नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी एका प्रोग्रॅमला जाणार होतो. मी नेहमीप्रमाणे आल्याबरोबर त्यांना फोन केला नाही. मी असा विचार केला की सकाळी आपण भेटू या. प्रोग्रॅमला बरोबर जायचंच आहे. मी सकाळी तयार झाले आणि त्यांच्याकडे गेले. तो काय बघते, बाहेरपर्यंत लोकांची गर्दी जमा होती. असा विचार केला की, हे सर्व लोक प्रोग्रॅमला जाणार असतील म्हणून जमा झाले असतील. मी तिथेच थांबले. किती तरी वेळ मला कळेचना. रेगेसरांनी मला पाहिले. आणि कोणाला तरी सांगितलं, भाबी आल्यात, त्यांना बाजूला घेऊन सांगा. मी आत गेले. आणि शहासाहेबांचं प्रेत बघून थक्क झाले. ही कल्पनाच नव्हती. मला किती वेळ समजेना. शेवटी धीर केला आणि जशोदताईंना भेटले. त्यांनी माझा हात जोरात पकडला. काय बोलावं सुचेना. थोड्या वेळानं सगळे म्हणाले, आपण प्रोग्रॅमला जाऊन येऊ या. आम्ही तिथे गेलो, मला तिथे भाषण करायचं होतं. ते केलं आणि ताबडतोब निघून आलो. त्यानंतर शहासाहेबांचं दहन केलं गेलं. ते दलवाई गेल्यानंतर ११ ऑक्टोबर १९८१ ला गेले.
 मला आठवतंय, शहासाहेबांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. 'रिलीजन अँड सोसायटी' (दलवाईंना अर्पण केलेलं) त्याचवेळी मी त्यांना भेटायला गेले असताना ते उठून उभे राहिले, मला नमस्कार केला आणि ते पुस्तक माझ्या हातात दिलं. म्हणाले, हमीदच्या जागेवर तुम्ही आहात. हे माहीत असताना की हमीदनं पुस्तक वाचलं असतं, या बाई पुस्तक वाचणार नाहीत. पण तरीही त्यांनी मला मान दिला.

 सावित्रीबाई फुल्यांची १५० वी जयंती सगळ्या महाराष्ट्रभर साजरी झाली. त्या निमित्ताने बरेचसे प्रोग्रॅम झाले. मुंबईला सुद्धा सबंध महाराष्ट्रातील मुलींच्या

१७२ : मी भरून पावले आहे