पान:मी भरून पावले आहे.pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाखवायची. ते वाचलेलं सगळं भाषण मला कळत सुद्धा नव्हतं. मुद्दा तेवढा कळत होता की धर्मांतराविरुद्ध आपण बोलत आहोत. मुसलमानांचं त्यात मत काय आहे हे सगळं त्या भाषणामध्ये होतं. काही ठिकाणी मग प्रश्नोत्तरं पण व्हायची आणि मग पुरुषोत्तम सेठभाईंनी मला तयार केलं. ते बरोबर यायला लागले आणि प्रश्नांना उत्तरं द्यायला लागले. सात दिवस होते. मी पहिल्यांदा गेलेली. कोणी बरोबर नाही. एकटीच. त्यांच्या घरी मी राहिले. मला बाहेर ठेवलेलं नव्हतं, कारण भीती. या एकट्या बाईला काही झालं तर? दलवाईंचे आणि त्यांचे संबंध फार चांगले असल्याने त्यांनी कॉलेज-कॉलेजमध्ये फिरवलं. बोलता आलं. म्हणजे मी बोल्ड होते तशी. आणि तशी बोलण्याची स्टाइल माझी आवडायची लोकांना. प्रश्न कळलेले होते. त्यामुळे मला बोलता यायचं. माझ्या परीने मी तयारी करायची.
 ठाण्याला व्यायामशाळा चालवणारे कृष्णा व्यवहारे यांनी माझी २-३ भाषणं ठेवली. तिसऱ्या भाषणाच्या वेळी ते मला म्हणाले,'बाई खरोखरच आता मुरल्यात याच्यात.' पहिल्या नि तिसऱ्या भाषणात जमीन अस्मानाचा फरक होता. पहिलं भाषण १० मिनिटांचंही झालं नाही. महंमददा म्हणाले, 'मी एवढं लिहून दिलं होतं. एवढंच कसं झालं हो?' मी म्हटलं, “एवढंच होतं. मला येई ना.' मग त्यांनी सांगितलं,'असं सुरू करायचं. असं खुलवायचं, असं संपवायचं. लोकांना सांगायचं,प्रश्न विचारा म्हणजे उत्तरं देता येतात.' मग प्रश्न आल्यावर ते आणि मी मिळून उत्तर द्यायला लागलो. तेव्हा तो विषय चांगला खुलला. मग प्रश्नांची मांडणी कशी करायची ते लक्षात आलं. सभांतून विरोधही व्हायचा खूप.

 तीन मे चा प्रोग्रॅम आम्ही घ्यायचो. ३ मे ७७ ला दलवाई गेले, म्हणून ३ मे ला आम्ही पहिली व्याख्यानमाला घेतली, दादरला. तीन दिवसांची व्याख्यानमाला करायची असं काही लोकांनी ठरवलं. त्यांच्यात आर.एस.एस. चा एक विषय ठेवला होता. वाद उठला तो ठेवू नका म्हणून. कशाला ठेवायचा आणि उगीच वाद उकरायचा म्हणून. माझा दीर होता ना हुसेन तो म्हणाला- नाही, ठेवायचाय. काही लोकं त्याला सामील झाली आणि तो प्रोग्रॅम झाला. पहिल्या दिवशी मी भाषण केलं. लिहून आणलेलं होतं थोडंसं. थोडंसं वाचलं. पहिल्याच पुण्यतिथीचा हा कार्यक्रम होता. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तो आर.एस.एस. चा विषय होता. तो भडकला. सत्यशोधक मंडळातील नाहीत, बाहेरची लोकं बोलायला बोलावली होती. मला त्या वेळी फारसं काही कळत नव्हतं. ही संघटना काय आहे, तिचं काम काय चालू आहे. पण काही तरी विरोध असणार

१६८ : मी भरून पावले आहे