पान:मी भरून पावले आहे.pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा त्यांचा ट्रेंड दिसला आणि या लोकांना गावामध्ये काय चाललंय आहे हे माहिती नव्हतं. दंगल होतेय, याची जरासुद्धा खंत नाही. 'मालूम नही, वहाँ पे क्या चला है. हम तो वहा जाते भी नहीं. क्यू जाना वहापे? क्या जरूरत है?' असं बोलून ते टाळू शकत होते. आम्हांला मुंबईला बसून असं वाटलं की, इकडे जाऊन हे सगळं बघावं, त्यांना मदत करावी. काय हकीकत आहे, कळावं म्हणून आम्ही इकडं आलो. पण इथल्यांना कसलीच खंत नाही. ज्यांना आम्ही युनिव्हर्सिटीत भेटलो ते सगळे मुसलमानच होते. मग आम्हांला नसीमा अन्सारी नावाची बाई भेटली तिथं. सोशलवर्कर होती. तिथं तिनं आम्हांला खूप साथ दिली. ती म्हणाली, 'हमीदभाई आल्यानंतर मी मीटिंगा घेतलेल्या आहेत इथे.' तिनं बायकांची मीटिंग तिथं घेतली. पुरुष कोणी नव्हते. सगळा शिकलेला वर्ग आला होता मुसलमान बायकांचा. सगळा ग्रूप गोळा झाल्यानंतर तिथं माझं भाषण झालं. मी एकटीच अडाणी त्या शिकलेल्या बायकांत. सगळ्यांना आवडलं ते. हे जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा अन्सारी बाईला इतकं आवडलं की ती म्हणाली, बरोबरच आहे. हमीदभाई पण हेच प्रश्न घेऊन आलेले होते. पण हमीदभाईंचं कोणी ऐकलेलं नव्हतं. ऐकायच्या तयारीमध्ये नव्हते. त्यांना मारायच्याच मागे होते. रायटमध्ये सुद्धा कर्फ्यू उठल्यावर तिनं ते भाषण ठेवलं होतं. आपल्याला बोलायला येतं असा कॉन्फिडन्स मला यायला लागला. तरी पण सगळे प्रश्न आपल्याला मांडता येत नाहीत, आपल्याला माहिती नाही, याची जाणीव मला होती. महंमद दलवाईंनी खूप भाषणं लिहिली होती. मग व्याख्यानमालांमध्ये मी भाषणांना जायला लागले. जेव्हा मला चांगलं बोलता येत होतं, वाचता येत होतं तेव्हा मी व्याख्यानमालेत सुद्धा चांगली बोलू लागले. वसंत व्याख्यानमालेत वाईला 'भारतीय मुसलमान – राजकीय आणि सामाजिक विश्लेषण' अशा विषयावर मी भाषण केलंय. किती सुंदर लिहिलेलं होतं. सगळी माहिती त्यात दिलेली होती. मग काही कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये व्याख्यानं अशी आयोजित केलेली. विषय घेऊन तयारी करून, जाऊन बोलावं. विषय मुस्लिम महिलांचे प्रश्न. हा विषय सगळ्यांशी जोडलेला आहे. हा विषय इतरांपासून वेगळा होऊच शकत नाही.

 मीनाक्षीपुरम्मध्ये धर्मांतर जेव्हा झालं नं, तेव्हा सातारला मी सात दिवस होते. तेव्हा कॉलेजमध्ये मी धर्मांतरावर बोललेली आहे. जेव्हा केरळ, तामीळनाडूमध्ये जबरदस्तीने हिंदूंना मुसलमान करत होते, तेव्हा लुंग्या, टोप्या वाटल्या. त्या काळामध्ये सुद्धा त्याचा प्रतिकार करायला, विरोध करायला मी साताऱ्यात फिरलेली आहे. मला लोक घेऊन जायचे. मी फक्त भाषण वाचून

मी भरून पावले आहे : १६७