पान:मी भरून पावले आहे.pdf/181

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो. तिकडं गेलो तेव्हा युनिव्हर्सिटीच्या कँपसमध्ये त्यांचे मित्र डॉ. बिलग्रामी होते. त्यांना भेटलो. यांच्या ओळखीची बरीच माणसं होती प्रोफेसरकीमध्ये. हे एकदा गेले होते तिकडे. म्हणजे यांना बोलावण्यात आलं होतं. पण तिथे त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. स्टेजवर गेले तर मारायला लोक उठले. तर त्यांना बिलग्रामी आणि त्यांच्या मित्रांनी मागच्या दारातून बाहेर काढून मुंबईपर्यंत कसं पोचवलं, हे आम्ही ऐकून होतो. पण लोकांनी का असं केलं ते आम्हांला माहिती नव्हतं. जिथं त्यांना येऊ दिलं नव्हतं तिथं आम्ही राहिलो. काश्मीरचे शेख अब्दुल्ला तिथं आले होते. त्यांचा प्रोग्रॅमही बघितला एक दिवस. त्यांचं भाषण ऐकलं. तिथं एक गंमत बघितली. शुक्रवारचा दिवस होता. नमाजाची वेळ झाली. ते अर्धवट मीटिंग सोडून नमाजाला गेले आणि ते नमाज पढून आल्यानंतर परत मीटिंग सुरू झाली. हे माझ्या लक्षात आलं. मग तिथं प्रत्येक प्रोफेसरला भेटून डीटेल चर्चा झाली. त्या चर्चेत मी खूप भाग घेत नसे. पण महंमद दलवाई भाग घेत. मला कळत होतं पुष्कळसं काय चाललंय ते. नाही कळलं तर त्यांना विचारायचं. त्यामुळे तर त्यांनी मला नेलं होतं आणि गंमत काय, युनिव्हर्सिटीची जी बाजू होती तिथे गडबड काही नाही. पण सिटीमध्ये गडबड होती. तिथं गरीब मुसलमानांची वस्ती होती. तेव्हा तिथं कर्फ्यू होता. कर्फ्यू उठला का आम्ही तिकडे हिंडून यायचो गावातून. तिथं दोन-तीन लोकांनी मदत केली आम्हांला. त्यांनी गाडीतून फिरवलं. सामान्य लोकांशी बोलणं झालं. घरी मग सगळ्या बायकांना एकत्र केलं. त्यांना मदत केली. त्यांची रिसीट घेतली. सिग्नेचर घेतली. शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तिकडे तेव्हा आम्हांला मारायला काही माणसं टपलेली होती. माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा ते. पण ज्यांनी आम्हांला तिकडं नेलं होतं ना, त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बघितलं का माझ्या बाजूलाच एक माणूस चाकू घेऊन उभा होता. 'भाभी इकडे या' म्हणून माझा हात धरला त्यांनी नि गाडीत घातलं आणि गाडी जोरात पळवली. ते म्हणाले, 'तुमचा खून झाला असता. त्याला आवडलं नाही तुम्ही इकडे आलात आणि सगळी चौकशी करता आहात.' आणि मला कल्पना पण नव्हती नि मला भीती पण नाही वाटली. नऊ दिवस तिथं राहिलो. जी युनिव्हर्सिटीची माणसं होती ती तिथंच राहाणारी माणसं होती. त्यांचे गावामध्ये संबंध चांगले होते. त्यांना ही मंडळी जेवणखाण नेऊन द्यायची, पोचतं करायची आणि त्यांच्याविरुद्ध जे होते त्यांना काहीही मदत करायचे नाहीत. ते मुसलमानच होते. म्हणजे असं की एकाला देतात, दुसऱ्याला नाही. आपल्याच लोकांना मदत करायची आणि दुसऱ्यांना करायची नाही

१६६ : मी भरून पावले आहे