Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या काळात ७ रुपये म्हणजे आजच्या काळात ७००० च्या वर. ते रिटायर्ड होईपर्यंत आमची आजी सुईणीचं काम करायची. म्हणजे मी बघितलेलं नाही तिला हे काम करताना, पण नंतरच्या तिच्या बोलण्यावरून मला हे सर्व समजलं.
 आमच्या घरात फारसं धार्मिक वातावरण नव्हतं. पण शुक्रवारी नमाज पढायचे. शाळेमध्ये असतानासुद्धा ते आम्हांला कंपलसरी होतं. मी जायची अँग्लोउर्दू हायस्कूलमध्ये. तिथे शुक्रवारी आम्हांला नमाज पढायला लागायची एकदाच. शुक्रवारची जुम्माची दुपारची नमाज, तिला महत्त्व असायचं, म्हणून ती नमाज पढायची. आमच्याकडे पुरुष मशिदीत जायचे. बायका घरात पढायच्या. दररोज पाच टायमाचा नमाज कोणी पढायचं नाही आणि आम्ही इतर उपास बिपास पण ठेवायचे नाही. आमचे रमजानचे महिने आले ना, की आमच्या घरात सगळे उपास ठेवायचे. तेव्हा मला मजा वाटायची. मजा वाटायची म्हणजे अशी की सैरी करायला पहाटे दोन-अडीच वाजता उठायला लागायचं. सगळे उठायचे. रात्रीची खिचडी गरम केलेली आहे. कालवण केलेलं आहे. खूप चांगलं जेवण असायचं. सगळेच उपास करतात आणि जेवायला चांगलं मिळायचं म्हणून सगळ्यांबरोबर मीही उठायची आणि ते सगळं खाऊन झोपायची. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत खाण्याच्या वस्तूच जमा करण्यात माझा वेळ जायचा. म्हणजे मला असं वाटायचं की आपला उपास आहे ना, चला आपण हे खाल्लं पाहिजे. पण हे आत्ता खायचं नाही, उपास सोडल्यावर खायचं. मग हे जमा कर, ते जमा कर, असं मी करायची. रोजा ठेवते म्हणून माझे खूप लाड व्हायचे. म्हणून तेवढ्यापुरतं मला ते आवडायचं. पण पहिल्यापासून मी कुठलीही गोष्ट सहजासहजी मान्य केलेली नाही. म्हणजे कुराणात सांगायचे की पैगंबरांच्या काळात असं-असं झालं, हसन-हुसेननं असं केलं. मोहरमच्या वेळी जे बोलतात ना की करबल्याच्या मैदानावर हजारो लोक एकीकडे होते आणि हसन हुसेन एका बाजूला होते आणि त्यांनी सगळ्यांना मारलं. हे मला पटत नसे आणि मी विचारायची, असं कसं होईल? हजारो माणसं एका बाजूला आणि दोन माणसं एका बाजूला असं लढूच शकत नाहीत. एक माणूस एका माणसाशी लढेल. इतक्या माणसांशी कसा लढेल? हे सगळं खरं नाही. पण तेव्हा आम्हांला कोणी उत्तर द्यायचं नाही.

 आमची आई धार्मिक होती. माझ्या वडिलांना धर्माची जरासुद्धा माहिती नव्हती. बिचाऱ्यांना नमाजसुद्धा पढायला यायचं नाही. माझी आई ईदच्या दिवशी त्यांना मसजिदमध्ये पाठवायची. तर ते शेवटच्या रांगेत उभे राहायचे.

मी भरून पावले आहे : ३