तेव्हा लोकं असं बोलायचे, 'आम्ही मुसलमान. आमची भाषा उर्दू.' तर दलवाई म्हणायचे 'नाही, आपण ज्या प्रांतामध्ये राहातो ती आपली भाषा. आणि ती भाषा आपल्याला येणं जरुरीचं आहे.' आमच्या घरामध्ये आम्ही जेव्हा मराठी बोलायला लागलो तेव्हा या हेतूनं मराठी बोलत होतो. का तर, मी मुसलमान असले तरी मी महाराष्ट्रात राहाणारी आहे. मला मराठी आली पाहिजे. मला मराठी का येत नाही? जशी येतेय तशी मी मराठीमध्ये पुटअप करून मराठीतच मी बोलेन. अशा तहेने मीटिंग्जमध्ये मी मराठीत बोलायला सुरुवात केली. काय व्हायला लागलं? महंमददा लिहून द्यायचे, लिहून दिल्यावर ते मला मराठीत वाचता यायचं नाही. बोलताना सोपं आहे, बोलणं मला जमायचं. आणि कोण काय बोलतात हेही मला कळायचं. पण गंमत अशी का लिहिणं येत नव्हतं. लिपी येत नव्हती. मग मी माझं डोकं जरा चालवलं. मग मी काय करायची, त्यांना सांगायची तुम्ही मराठीमध्ये हळूहळू बोला आणि मी उर्दू लिपीत मराठी लिहून घ्यायची. ते वाचून काढायची. मला मराठी बोलायला येत असल्यामुळे ते वाचायला यायचं. आणि मला काही समजलं नाही तर मी त्यांना विचारायची. त्यांची भाषा फार कठीण होती. त्यांना यायचं म्हणून ते फार कठीण शब्द वापरायचे. त्या कठीण शब्दांचे अर्थ काय? मी हे लिहिलेले आहे याचा अर्थ काय? समजा मी मीटिंगमध्ये गेले आणि मला प्रश्न विचारला, तर मला उत्तर देता आलं पाहिजे. नाहीतर लोकं माझी टर उडवणार. मला वाचतासुद्धा सुरुवातीला यायचं नाही. पण मी ते लिहिलेलं हातात घेतलं का मला मी स्टेजवर उभी राहिल्यावर जरा धीर यायचा.
नंतर नंतर महिला मंडळं मला बोलवायला लागली. तिथं आमचे प्रश्न काय आहेत ते मी मांडायची. आमचे जे काय प्रोग्रॅम व्हायचे तिथं आम्हांला बोलायचं होतं. तिथं मी भाग घ्यायची, बोलायची. जसे सय्यदभाई बोलायचे. बाकी सगळे बोलायचे. तशी मी पण बोलायला सुरुवात केली. मला मुस्लिम महिलांसाठी काम केल्याबद्दल १९८० साली आंतरभारतीचा सूसन बी. अँथनी अॅवार्ड' मिळाला. तो प्रोग्राम जनता केंद्र, मुंबई येथे झाला. न्यायाधीश नाथवानी साहेबांच्या हस्ते तो पुरस्कार मला दिला गेला. त्या वेळी एस.एम.जोशी म्हणजे अण्णा आणि यदुनाथ थत्तेजी पण तिथे होते. सगळ्यांची भाषणं झाली. मी जेव्हा भाषण करायला उठले त्या वेळी माझ्या हातात लिहिलेलं माझं भाषण होतं. मी बोलत होते मराठीमध्ये आणि पन्ने फिरत होते उलटे. हॉलमध्ये बऱ्याच लोकांना किती घेळ कळेचना की हा काय प्रकार आहे. कुजबूज सुरू झाली. आणि लोक एकमेकाला विचारायला लागले.