पान:मी भरून पावले आहे.pdf/178

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'आपभी उनमे शामील हो जाइए.' असा मला खूप त्रास झाला सुरुवातीला. म्हणजे लोकांनी खूप त्रास दिला. त्यांनी असा प्रयत्न केला की मी काम करू नये. पण माझ्या मंडळाची जी माणसं होती, म्हणजे हुसेन जमादार त्याच्यात होते. सय्यदभाई, अन्वर शेख त्यांच्यात होते. अमीरभाई होते. आणि बरीच लोकं होती. त्या सगळ्यांनी साथ दिली ना! बाई कोणी नव्हती हो आमच्यामध्ये. अॅडव्होकेट नजमा शेख आणि मरियम रिफाय अशा दोन बायकांना तयार केलं होतं. पण व्यक्तिगत कारणामुळे त्या काय शेवटपर्यंत टिकल्या नाहीत. त्या कामाला आल्या नाहीत. मग कसं काम करणार? काय करणार? त्यामुळे प्रश्न यायला लागला. मग पुढच्या काळामध्ये महंमद दलवाईंनी मला खूप मदत केली. कशी? ते स्वतः आधी वाचायचे. त्यांना प्रश्न माहिती होते. मग कसे मांडायचे, ते त्यांनी सांगितलं. त्यांनी मेहनत खूप घेतली. ते काही भाषणं करायचे नाहीत पण दलवाईंना काही भाषणासाठी मदत करायचे. आणि इंग्लिशमध्ये असलं की मदत जास्त व्हायची. ते पुस्तकं वाचायचे इंग्लिश. महंमददांचं इंग्लिश चांगलं होतं. त्यामुळे इंग्लिशची मदत त्यांना व्हायची, विचारांची मदत व्हायची. चर्चा करण्यात मदत व्हायची. या सर्वांमुळे हे तयार झालेले होते. माझ्यावर मात्र मेहनत महंमददांना खूप करावी लागली. का तर मी खूपच अडाणी होते. मी दलवाईंची व्याख्यानं ऐकली होती. पण ते सगळं मला समजत होतं असं नाही. पण त्या वेळी मला काही प्रश्न माहिती होते. काही प्रश्नांवर हे बोलतात हे माहिती होतं. कुठच्या? तर तलाकबद्दल, जबानी तलाकबद्दल. तीनदा तलाक म्हटल्यावर बाईला त्रास काय होतो? त्याचे पुढचे परिणाम काय होतात? नवरा बाईला का सोडतो? काय काय होतं... हे इश्यू मला माहिती होते ना. आणि आसपासच्या बायकांचे प्रश्न दिसत होतेच. आमच्याकडे अशा बायका यायच्याच ना घरी. त्यामुळे मला त्यांचे प्रश्न माहिती असायचे.

 सुरुवातीला भाषणं करायची तेव्हा मला खूप घाबरायला व्हायचं. वाटायचं की भाषणं करू नयेत बाबा. बाकीचं सगळं काम करावं. पण भाषणं करू नयेत. महंमददा म्हणायचे, 'का नाही, भाषणं जिथं जरुरी आहे तिथं तुम्हांला करावीच लागणार आहेत. तुम्ही भाषणं सोडून काम कसं करणार? त्यासाठी तुम्हांला बोललंच पाहिजे.' आणि ते मला म्हणायचे, 'मराठीतूनच बोलायचं. तुम्ही लेखकाची बायको आहात. तुम्हांला मराठी आलं पाहिजे.' आणि आम्ही असं म्हणतो, का बाबा मराठीमध्ये का बोलायचं? तर मराठीमध्ये बोलायचं, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहातो. मुसलमानांची भाषा उर्दूच आहे, असं आपण मान्य करायचं नाही. का तर

मी भरून पावले आहे : १६३