पान:मी भरून पावले आहे.pdf/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मीटिंगा घ्यायचे. त्यांची शेवटची मीटिंग पण घरातच झाली. त्यांना जेव्हा असं कळलं का आपण जगणार नाही, काही करू शकणार नाही तेव्हा यांनी सांगितलं, 'आपण लोकांना, कार्यकर्त्यांना जमा करू या.' महाराष्ट्रभर कार्यकर्ते होते. सगळ्यांना पत्र टाकली. घरी बोलावलं. त्या दिवशी त्यांची तब्येत फार खराब होती. पाणी पण घेता येत नव्हतं त्यांना. पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी त्यांना घरी आणलं होतं. दिल्ली दरबारची बिर्याणी मागवली होती. आणि सांगितलं होतं की शेवटची माझी बिर्याणी कार्यकर्त्यांना नेऊन दे. हॉलमध्ये सगळे जण जमले होते. पलंगावर यांना झोपवलेलं होतं. बाबूमियाँ बँडवाले पण आले होते. ते ह्यांच्या पलंगावर बसले होते. मला हे म्हणाले, 'तू या हॉलमध्ये बसायचं नाही. हे दार आहे, याची एक फळी बंद करायची. खुर्ची तिथं लावून त्यावर बसून नुसतं तू ऐकायचंस. तू या खोलीत यायचं नाहीस. एकही शब्द तू आत येऊन बोलायचा नाहीस. शेवटची मीटिंग आहे.' आणि ती मीटिंग झाली. ते म्हणाले, 'जनरल सेक्रेटरीचं पद मी सोडतो.' किती त्रास झाला असेल हे सांगताना! सगळं कामाचं सांगितल्यानंतर हे शेवटी सांगितलं. लोक म्हणाले, 'तुम्ही अजून आहात नं? बरे व्हाल.' ते म्हणाले, 'मी याच्यातनं बरा होणार नाही. आणि कामाचा खोळंबा व्हायला नको. त्यामुळे तुमच्यापैकी पुढे येऊन कोण काम करणार? त्यानं पुढं यावं. हे पद त्याला जावं.' हे त्यांनी निश्चित केलं. ही शेवटची मीटिंग. सगळे लोक निघून गेले. त्या दिवशी हे जेवले नाहीत. सगळे लोक खाऊन-पिऊन निघून गेल्यानंतर बाबूमियाँना मिठी मारून ते खूप रडले. बाबूमियाँ बिचारे दर वेळी त्यांच्या बरोबर असायचे. हॉस्पिटलमधून घरी आणलं का बाबूमियाँ यायलाच पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये गेले का बाबूमियाँ जायचे. असं सारखं चालू असायच. बाबूमियाँचं इतकं प्रेम होतं. त्यांना रेकॉर्ड-बिकॉर्ड ऐकायची सवय होती. मग ते आले का हे लावायचे. ऐकत बसायचे. दोघांच्या गप्पा मग रेकॉर्ड लावताना. त्या गाणाऱ्याच्या पिढीच्या पिढीची माहिती द्यायचे. इतक्या त्यांच्या गप्पा चालायच्या. हे सगळं आटपलं.

 कामाचं बोलायला सुरुवात केली. तेव्हा हे सगळं डोक्यात होतं. मी शहासाहेबांना असं विचारलं भीत भीत, का तर ते मोठे होते. 'शहासाहेब, मी एक गोष्ट सांगू का? माझ्या मनात काम करायचं आहे. मी इथं निश्चित करून जाणार आहे. पण मला काहीच येणार नाही करायला. मला स्टेजवर उभं राहता येणार नाही, भाषण करता येणार नाही. माझं वाचन नाही, माझे विचार नाहीत. मला

मी भरून पावले आहे : १५९