दलवाईंच्या चाहत्यांची खूप पत्रं आली. भेटणं झालं. सगळ्या महाराष्ट्रातील लोक येऊन मला भेटून गेले. पत्रांचं एवढं मोठं बंडल माझ्याकडे आहे. कोणालाही मी ओळखत नाही. पण दलवाईंचे चाहते एवढे होते! त्याची फाइल मी करून ठेवलेली आहे आणि मिसेस शहा – जशोदताई ती पत्रं मला वाचून दाखवायची. तिनं माझ्याकरता खूप मेहनत घेतली. त्यांची वरची खोली आम्हांला दिलेली होती. का तर मोकळेपणानं आम्ही राहावं तिथं. एकोणीस दिवस तिनं खूप आमचा पाहुणचार केला. आणि मग यदुनाथ थत्ते म्हणाले, 'आता तुमच्या मनात काय आहे ते लिहा. साधनामध्ये आपण ते छापू या. भाभी तुम्हांला लिहिता येत नाही असं म्हणू नका. जसं तुम्हांला येईल तसं लिहा.' आणि त्या वेळेला आम्ही एक एक लेख तिघींनी बसून लिहिला होता. त्यातला रुबीनाचा लेख खूप चांगला होता, तिला बाबांची कला होती. त्यामुळे तिचा लेख खूप गाजला.
नंतर काही दिवस गेले आणि आम्ही कामाबद्दल बोलायला लागलो. महंमददा यायचे तिथे. शहासाहेब महंमददांना म्हणाले, 'हमीद गेला. त्याची जागा तर कोणी घेऊ शकत नाही. पण तुला आम्ही थोडसं मानधन देऊ, कामाचं चीज म्हणून. तर तू हमीदच्या जागेवर काम करशील का?' 'कोण करणार काम? मी? नाही नाही', महंमददा म्हणाले, 'हमीद तो हमीदच. मी काही स्टेजवर उभा राहू शकत नाही. माझ्याकडे कितीही बुद्धी असली तरी मी काही हमीदची बरोबरी करू शकत नाही. मला हे काम झेपण्यासारखं नाही. मला पैसे नकोत. पण मला हे कामही होणार नाही.' मग थोडे दिवस मी विचार केला. मी असा विचार केला की कशा तऱ्हेनं मी हे काम करावं? काय करावं? जेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती त्या वेळी एकदा काय झालं, अंधेरीचे ते मुल्लानी आमच्याकडे आले. त्या वेळी ते मंडळाच्या बायका-बियका जमा करण्याचं काम करत होते. त्या वेळी ते आले आणि म्हणाले, 'दलवाई आपा, तुम आएगी क्या अंधेरीमे? मै औरतों को जमा करता. तुम जरा बात करो.' आणि दलवाईंना सांगितलं, 'मै जरा आपाको लेके जाता हूँ.' आणि मी तिकडे गेले. तिकडे एका खोलीमध्ये गेलो. खिडक्या, दरवाजे सगळे पॅक. गच्च भरलेले बायकांनी, पुरुषांनी. बायका सगळ्या हॉलमध्ये बसलेल्या नि पुरुष सगळे बाहेर. भीती अशी की पहिली सभा आहे. हे उधळून लावतात, ऐकतात का काय करतात? पण काहीही गडबड तिथं न होताना ती मीटिंग खूप चांगली झाली. मग त्यांनी येऊन सांगितलं, 'आपाला नेलं ते किती बरं झालं. कितना अच्छा बात आपा करती है.' हे हसले गालातल्या गालात. तेव्हा आजारीच होते. मग हे सारख्या