आमचे नातेवाईकच आम्हांला काय करतील? ते होऊ नये म्हणून आम्हाला ताबडतोब नेण्यात यावं, असं लिहिलं होतं. शहासाहेबांनी येऊन मला विचारलं, 'मेहरुन्निसाबाई, काय करायचं?' म्हटलं, 'तुम्ही मला न्यायचं. त्यांनी तुमच्या स्वाधीन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मला न्यायचं. एवढंच.'
हे मरायच्या अगोदर काही दिवस, एक १५-२० दिवस आधी अशीच त्यांची तब्येत बिघडलेली होती. श्वासोच्छ्वासाचा खूप त्रास झाला आणि त्यांना इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हा असं वाटलं का हा माणूस आता जाणार. तिथं आय.सी.यू. मध्ये ते सारखी आठवण काढत होते की शहांना बोलवा म्हणून. फोन करून शहांना बोलावलं. मी आणि शहा त्यांच्या बेडजवळ होतो. शहांच्या कानात काहीतरी बोलले-बिलले. आणि मग मी लांब होते ना तर शहांनी मला जवळ घेतलं अन् म्हणाले, 'अरे त्यांची काळजी अशी का करतोस तू? मी आहे ना. मी सांभाळेन. मी सोडणार नाही रे तिला. तू काही काळजी करू नको. मी असताना तिला कोण हात लावणारे? मी सगळं प्रोटेक्शन तिला देईन.' त्यांना काळजी वाटायची. पण असं कधी बोलून दाखवलं नव्हतं.
आणि मग चंदनवाडीतून आलो तेव्हा पवारवहिनींनी पोहे केले. सगळ्यांना खायला दिले. मला तोंड धुवायला सांगितलं. कपडे बदलले मी. माझी बॅग पवारवहिनींनी नीट भरली. आई व माझी आत्या घरात होत्या. त्यांना हे सगळं नवंच होतं. म्हाताऱ्या होत्या पण दोघींनी गोंधळ केला नाही. त्या वेळी गुपचूप होत्या. त्यांच्या मनात होतं चंदनवाडीत यायचं. पण म्हाताऱ्या आहेत बघवायचं नाही, असं मला वाटलं. म्हणून माझी आत्येबहीण दौलत आली होती म्हणजे महंमददांची बायको, तिच्याबरोबर मी दोघींना तिच्या घरी पाठवलं. मग महंमददा म्हणाले, 'यांची काळजी तुम्ही करू नका. मी घरी घेऊन जातो यांना माझ्या. तुम्ही नाही नं काकी – तोवर मी यांना सांभाळीन.' आपले व्हाइस-चॅन्सेलर दाभोळकर आले होते गाडी घेऊन. शहांनी गाडी आणली होती. पवारांनी १-२ गाड्या काढल्या. प्रोटेक्शनसकट आम्हाला त्या गाड्यांत बसवलं. पोलीस प्रोटेक्शन. सगळं होतं. गाड्या भरून माणसं होती. त्याच्यात आम्हांला पुण्याला शिफ्ट करण्यात आलं.
पुण्याला आम्ही आलो. मी १९ दिवस पुण्याला होते. तिथे माझे मामा-बिमा येऊन भेटले. पण काही नातेवाईक मला भेटायलाही आले नाहीत आणि त्यांनी मला घरीसुद्धा नेलं नाही. थोडासा धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्यावर बसलेला होता.
मी भरून पावले आहे : १५७