पान:मी भरून पावले आहे.pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चेकअप झालं, तारीख फिक्स झाली पण त्यातच त्यांना कावीळ झाली. त्यामुळे पथ्य पाळणं सुरू झालं. डोळे पिवळे झाले. ताप यायला लागला. जेवण जाईना. असं सगळं झालं. नगरकर एक दिवस आले आणि मला कँटीनमध्ये घेऊन गेले आणि मला म्हणाले, 'रुबीनाची किडनी घेता यायची नाही.' 'का नाही?' 'डॉक्टर म्हणतात आता तिची किडनी घेतली तर काय उपयोग? तिची किडनी आता घेऊ नये. आपण आता आणखीन तिसऱ्या माणसाची किडनी घ्यावी, लावावी आणि ती रिजेक्ट झाल्यानंतर रुबीनाची घ्यावी. अशी प्रोसिजर चालणारच. दोन-दोन वर्षांनी.' असेच पेशंट होते ना. ऑपरेशनला एक तर कोणी तयार नसे. आणि तयार झाले तरी २-३ वर्षंच टिकायची किडनी. त्यामुळं असं ठरलं की दुसऱ्या कुणाची तरी किडनी घ्यायची. पण ही किडनी मिळेपर्यंतच यांची तब्येत डाऊन होत राहिली. ते जाणार असं सगळ्यांच्या लक्षात आलं. दुसरी किडनी मिळते का नाही, हा प्रश्न होताच. पण ती लावायला तरी चांगला असला पाहिजे ना माणूस? किडनीचं ऑपरेशन करायला तो माणूस तेवढा चांगला फिट तरी असला पाहिजे ना. किडनी मिळण्याची गोष्ट दुसरीच, पैसे देऊन घ्यायची तयारी आहे, पण त्या माणसालाच जर झेपत नसेल तर दुसरी किडनी लावून काय करणार होतो? डॉक्टर म्हणाले किडनीचा आता फारसा काही उपयोग होणार नाही. आणि हा माणूस डायलिसिस वर राह्यला तयार नाही. काय करायचं मग? हे खचले ना त्यामुळे. त्यांना असं वाटत होतं का दोन-चार वर्षं तरी जातील. तर तसं झालं नाही. सव्वा वर्षामध्ये तो माणूस सगळा आटपत गेला. त्यामुळे आता परत तीच प्रोसिजर, त्याला ते कंटाळले होते. कारण याला अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अशक्तपणा आलेला, बेडसोअर्स असे झाले होते की हलायला होत नव्हतं. आणि हॉस्पिटलमध्ये राहायला तयार नव्हते. चार दिवस अगोदर मला म्हणत होते मला घरी ने. तू सगळं माझं करू शकतेस मेहरू. काही नर्सची गरज नाही. तू मला घरी ने. मला इथं नको मरायला. आता कुठं न्यायचं, शेवट कसा करायचा हे विलमध्ये होतं. पण काही डिसीजन ऐन टायमाला मलाच घ्यावे लागणार होते. ते आधी ठरलेलं नव्हतं आणि तो डिसीजन घ्यायला मी हॉस्पिटलमध्येच राहायला पाहिजे होतं. प्रत्येक जण आला का त्याला हे सांगायचे, मला घेऊन चल म्हणून आणि मी सांगायची, 'नाही हं, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय या माणसाला इथून हलवायचं नाही.' ते माझ्यावर चिडायचे नंतर. पण मी म्हटलं, 'नाही, मी तुम्हांला कुठेही जाऊ देणार नाही. मी पण नाही येणार आणि तुम्हांला पण कुठे जाऊ देणार नाही.'

मी भरून पावले आहे : १४९