पान:मी भरून पावले आहे.pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गाडी बोरिवलीची होती. अंधेरीला न उतरता हा माणूस थेट गेला बोरिवलीपर्यंत. म्हणजे झोप लागली म्हणा, का गप्पा मारत होते म्हणा. कळलंच नाही. गाडी बोरिवलीला जाऊन थांबली. सगळे उतरले. पण हे कुठे जाणार? गाड्या नाहीत. बोरिवलीला आपलं कोणी नाही. इतक्या रात्री २ वाजता कोणाकडे जाणार? हा माणूस तिथून चालत अंधेरीला आला. आणि त्या काळात चांगलं हे एवढं जंगल. आता काहीच नाही. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. ४-५ स्टेशनचं अंतर, तेवढं ते चालत आले घरी, जंगलातनं नि रात्रीचे दोन-तीन वाजता. काहीही त्यांना भीती वाटली नाही. मराठामधूनही सुटले ना रात्री बारा-एकला, तर घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नसायचा, का यांना कुणी मारून फेकतं की काय! कारण यांचं मरण तसंच यायचं ठरलेलं होतं. कोणी तरी यांना मारणार आणि हे मरणार. पण हा रोग कसा लागला आणि मध्येच हे कसं झालं! हे निर्भय. रोगाची सुद्धा भीती नाही. इंजेक्शन घेतलं काय, इथं टोचलं काय, काहीही वाटायचं नाही. कुठल्याही गोष्टीला पुढेच. मला ते बघवत नसे. मला ते बघण्याची हिंमत नव्हती. पण मी त्यांना सोडून जायची नाही. त्यांना काहीही झालं तरी त्यांच्या हातात माझा हात असायचाच आणि समोर डॉक्टर त्यांचं काम करायचे. हळूहळू ते सगळं पाहण्याइतकी धीट झाले. मला असं वाटायचं नाही का यांना सोडून जावं. बाहेर चैन पडायचं नाही. यांचं कण्हणं, किंचाळणं काही नसायचं. काहीही केलं डॉक्टरनी तरी यांचा आवाज यायचा नाही. कधीही नाही. पण जेव्हा बेडसोअर्स झाले तेव्हा शेवटी, हलवा-हलवी करायची नव्हती तेव्हा, नर्स जरी दिसली तरी ते म्हणायचे, 'मेहरू, ती बया आली बघ. माझ्या पायांना हात लावेल, ती दुखवेल. तिला हात लावू देऊ नको. तू माझं कर. तुला त्रास होतो ग, पण तू माझं कर.' आणि मी म्हणायचे, 'अहो मला ते धुता येत नाही. मी डॉक्टर नाही, मी नर्स नाही, तिला करू दे.' मग ती नर्स म्हणायची, 'तुम्ही इथं थांबा आणि मला करू द्या.' त्या वेळी नर्स जबरदस्तीनं सगळं करायची. त्यांना ते सहन व्हायचं नाही. औषध-बिवषध खाण्याचं वगैरे काहीच वाटायचं नाही. म्हणजे आम्हांला जर औषध खायचं असलं तर कंटाळा येतो. हे कडू आहे, हे गोड आहे. याच्याबरोबर साखर खा. याच्याबरोबर गोड खा, पाणी घे. गुळणी करा. असे नखरे असायचे. पण हे असे फटाफटा घ्यायचे. डोळ्याचं औषध चालूच होतं. त्यांच्या एका डोळ्यामध्ये ग्ल्युकोमा झालेला होता. त्याचं पण ऑपरेशन झालेलं होतं. बसवलेली किडनीही आता खराब झाली. तेव्हा असं ठरलं की रुबीनाची किडनी घ्यायची. मग सगळं

१४८ : मी भरून पावले आहे