पान:मी भरून पावले आहे.pdf/162

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असं वाटलं. एक वयस्कर बाई हातात जेवणाचा डबा, जो त्यांना पेलवतसुद्धा नव्हता, उचलून आणत होत्या. आत येताच पुढे होऊन त्यांनी माझा हात धरला, आणि म्हणाल्या, 'मेहरुन्निसा, मै तुम्हे पहिली बार देख रही हू. हमीदने कभी मिलायाही नही. लेकिन तुम्हारी तारीफ हमीदसे बहोत सुनी है. जैसा सुना है वैसीही हो तुम.' मग त्या दलवाईंच्याजवळ गेल्या. त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. आणि फार प्रेमाने आपल्या हातांनी त्यांनी त्यांना जेवण वाढलं. मी बघतच राहिले. मग कुलसुम आपानी सगळी आपली माहिती मला दिली. त्या दलवाईंना खूप मानत होत्या. लोकांच्यासमोर त्यांची तारीफ करायच्या. सांगायच्या, हाच माझा शिक्षक आहे. त्या हयात आहेत. माझ्यावर खूपच त्यांचा लोभ आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये त्या असतात.

 पुढं तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये पुन्हा किडनीचा प्रश्न आला, ही किडनी काढून आता दुसरी बसवायला पाहिजे, नाही तर हा मनुष्य जाणार इतकं झालं । होतं. किडनी रिजेक्शन म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यात. लघवी होतच नाही. लघवीद्वारे जे विष बाहेर पडतं ते शरीरात साठतं. म्हणजे इथं पाणी साठलंय, तिथं पाणी साठलंय आणि ते विष निघत नाही. त्यामुळं त्याचा त्रास होतो ना तब्येतीला. शरीरामध्ये पाणी साठलेलं असतं. हात लावला की कळायचं इथे पाणी साठलंय. म्हणजे असं फुगून यायचं आणि डॉक्टर सांगायचे ना की तुम्ही पाणी कमी प्या, अमुक करा. लघवीचं भांडं जे आहे नंबर असायचे त्याच्यावर. किती लघवी झाली ते मोजमाप करायचे. हे तसे भित्रे नव्हते. कसलीही त्या माणसाला भीती नव्हती. मी बघितलंय, आमच्या गावामध्ये जंगल आहे. जंगलाची तिथं राहणाऱ्या लोकांना भीती नको असं म्हणतात. तिथं राहाणारे आमच्या घरातले बाकीचे लोक भित्रेच होते. रात्र झाली का बाहेरचं दार बंद करून ठेवायचे. जंगलात जायचं नाही. पण यांना काही वाटायचं नाही त्याचं. वाटेल तेव्हा हे बाहेर निघून लघवीला, संडासला जा असं करायचे. वाघाची, सापाची कसलीच भीती वाटायची नाही. निर्भय वृत्ती. माणसाची सुद्धा भीती वाटायची नाही. जेव्हा हे मॉबमध्ये जायचे तेव्हा कुणी अंगावर धावत आला तर मागे सरकणं त्यांना माहिती नव्हतं, किंवा दुसऱ्याला मारतायत तर मारू देत त्यांना; आपण पळ काढावा असंही नव्हतं त्यांचं. एकदा गंमत झाली. हे चर्चगेटला गाडीत बसले अंधेरीला उतरायचं म्हणून. रात्रीची दीडची गाडी. शेवटची गाडी त्या वेळची. आणि मग काही तास गाडी बंद असायची आणि मग साडेचार-पाच वाजता पुन्हा सुरू व्हायची. गाडीत बसले, ती

मी भरून पावले आहे : १४७