पान:मी भरून पावले आहे.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी पण त्यावेळी पाच हजाराची मदत केली होती. आणि मग पुन्हा शहांना विचारलं होतं मी हमीदसाठी काय करू? मला आणखीन काही करायचंय, तर ते म्हणाले एक काम करा, त्यांचा एक भाऊ आहे, तो आता एस.एस.सी. झालेला आहे. त्याला तुमच्याकडे बँकेमध्ये नोकरी मिळाली तर मिसेस दलवाईंना काही बघायला लागणार नाही. इथे नोकरी करून गावाकडच्यांना पोसणं आता शक्य होणार नाही. हमीद करत होता कसं तरी, त्या कसं करणार? मग हे असतानाच, त्यांचा भाऊ फिरोज आला, तर त्याची कशी टिंगल करायचे. एवढी मोठी पिशवी आणि त्याच्यात एक एस.एस.सी.चं सर्टिफिकेट. असं हलवत आणलं. ते म्हणाले, "फिरोज वेड्या, एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये काय आणलंस? तर एक एस.एस.सीचं सर्टिफिकेट! थर्डक्लास मिळालेलं! तो हुशार बिशार मुलगा नव्हता, पण त्याचा नॉमिनल इंटरव्यू घेतला आणि चिपळूणला त्यांची देना बँकेची ब्रँँच उघडल्याबरोबर त्याला लावून घेतलं.

१४२ : मी भरून पावले आहे