Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण लोकं म्हणजे यांची भावजय बिवजय गावाहून आली की हसनशेठ, त्यांचे घरवाले चांगला डबा यांना पाठवायचे. हे काय, एवढं एवढं खायचे. त्यांनी नाही खाल्लं की आम्हीच खात होतो ना ते सगळं? त्यामुळे असं जेवण अधूनमधून मिळायचं. सुट्टीचा दिवस असेल तर अधूनमधून मिळायचं, नाही असं नाही.

 आणि त्या काळामध्ये एकदा, सगळे भेटायला येणार होते. म्हणजे यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि पवारसाहेब. हे मला आधी कळलं होतं की ते भेटायला येणार आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्ये सकाळपासून सफाई सुरू. ते लोक संध्याकाळी येणार, भेटणार म्हणून. मी दलवाईंना म्हटलं, 'हे बघा, हे सगळे येणार आहेत तुम्हांला बघायला. मनमोकळेपणानं त्यांच्याशी बोला, तुम्हाला काय वाटतंय ते. तुम्ही त्यांच्याशी बोलणार ना? तुमच्यासाठी ते येणार आहेत भेटायला. पवारसाहेब त्यांना घेऊन येणार आहेत.' त्या वेळी पवारसाहेबांची कल्पना पण अशी होती की हमीदशी जरा बोलावं. माझ्यासाठी त्यांनी काय करावं आता पुढे? त्यांच्या फॅमिलीसाठी काय करावं? त्यांची फॅमिली खूप मोठी होती ना! काय करावं आम्ही? त्यांच्या मनात काय आहे? तर ते सगळं विचारायला म्हणून ते आले. जेव्हा ते आले ना, खाली बातमी आली, ते आलेत. मी म्हटलं, 'हे बघा, ते येतात त्यांच्याशी तुम्ही आता चांगलं बोलायचं. 'हो' म्हणाले. पण ते आल्यानंतर जे फिरून झोपले, ते डोळे बंद करून. एकही अक्षर ते जाईपर्यंत बोलले नाहीत. कुणाशीच बोलले नाही. ते सगळे आले आणि मला म्हणायला लागले, काय झालं? त्यांना मी म्हटलं, मला माहिती नाही, तुम्ही मला काही विचारू नका. ते इतके डेस्परेट झालेले आहेत की कुणाशीच बोलण्याची त्यांना इच्छा राहिलेली नाही. सॉरी हं. तुम्ही क्षमा करा. त्यांच्या वतीनं मी क्षमा मागते. ते म्हणाले, 'नाही नाही, तुम्ही असं बोलू नका. तो पेशंट आहे, आम्ही बघायला आलो.' पवारसाहेबांना असं वाटलं की, हा माणूस असं काय करतोय? पण बोललेच नाहीत हे. त्यानंतर त्यांच्या मीटिंगा झाल्या, आणि मग पवारांनी मुद्दा मांडला का, आता हा गेल्यानंतर आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे? याची सगळी फॅमिली उघडी पडेल. याची बायको नोकरी करते, पण घर कसं चालणार याचं? तर काही तरी हवं म्हणून मानधनाची जी कल्पना होती ती पवारांची होती. पाचशे रुपये म्हणा, ते गेल्यानंतर लेखक म्हणून मानधन मिळायला लागलं, ती मानधनाची सोय त्यांनी केली. देना बँकेचे मॅनेजर होते मोठे, गुल महंमद रशीद असं नाव होतं त्यांचं. खूप येणं जाणं होतं त्यांचं.

मी भरून पावले आहे : १४१