असा आमचा विषयच हा होता. जगातल्या दुसऱ्या कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार? त्यामुळे मी लिस्ट केली होती त्यांच्यादेखत, सगळ्यांचे फोननंबर काढून माझ्या पर्समध्ये तयार असायचे. की अर्ध्या रात्री काही झालं तर आपण इथंच बसायचं आणि फोन करायचे. आपण धावणार कुठे आणि कोण मदतीला येणार? आणि एवढं करायची आपल्याला गरज काय, मयत सोडून? जवळच्या माणसांना माहिती होतं, हे सगळं चालू आहे आमचं म्हणून. मनाची सगळी तयारी झाली होती माझ्याही आणि त्यांच्याही. आणि शेवट शेवट त्यांचा त्रास बघवत नव्हता ना, तर मला कधी कधी असं वाटायचं, की देव कुठं आहे का? असलास तर बाबा ने यांना. मला आता बघवत नाही. या सगळ्या जखमा म्हणजे त्रास नाही? बेडसोअर्स झालेले आहेत. आत्ता श्वास चालतो, आत्ता बंद होतो हे काय कमी होतं का? काय कमी होतं? रात्रभर मी झोपायची तर अशी तळमळायची. सतरांदा उठून त्यांच्या नाकाला हात लावून बघायची की हा मनुष्य आहे का गेला? काय होतंय त्याला कळायला काय मार्ग होता दुसरा? इतका जवळ होता मृत्यू. आणि किती वर्षं असायला पाहिजे? रोजचंच चालू होतं. तिथं माझं तोंड असं सुजलेलं होतं. मला ब्लडप्रेशरचा त्रास व्हायला लागला. खायचं नि तिथं बसायचं. वर त्यांना अन्न जात नसे. शेवटी शेवटी तर अन्न जातच नसे त्यांना. आणि मला तर जरा वेळ गेली भुकेची, की मी तळमळायची. आणि मग कोणी तरी चोरून मला खायला द्यायचं. पवार वहिनी काय करायची, हवालदारांना पाठवायची ना, तर हवालदार असे आपल्या वर्दीमध्ये लपवून, डबा आणायचे. आणि एक डहाणूकरबाई होत्या, त्यांची आणि मिस्टर डहाणूकरांची ओळख करून दिलेली होती आमच्याशी नगरकरांनी. त्या बाई नेहमी यायच्या गाडी घेऊन आणि डबा मला द्यायच्या, खायला घालायच्या आणि मग म्हणायच्या माझी गाडी आहे. जा, फिरून ये. मी दोन तास बसते. मी बघते दलवाईंकडे. तुम्ही जा. तुमच्या मैत्रिणीकडे जा. ती बाई मदत करायची. माहीमला राहणारी होती. तर अशा रीतीने लोक मदत करायला हाेते. कोणी तरी डबा चोरून आणायचे- का तर वर परमिशन नव्हती- आणि मला खायला घालायचे. मग कधी हे चेष्टा करायचे. मला म्हणायचे, 'कुणाचं काहीही होऊ दे, मेहरू, तू पोटभर खा, तुला भूक लागणार. तू पोटभर खा.' अहा, पण मी काय करू? पोटभर खाऊ नको, तर काय करू? तुमच्याकडे जर बघायच असेल तर मला धडधाकट राह्यलाच पाहिजे.' जे मिळायचं ते गिळायची ना मी! मला काय मिळत होतं तेव्हा खायला, असं बोलायला?
पान:मी भरून पावले आहे.pdf/155
Appearance