Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याच वेळेस एक पत्र आलं. त्यात लिहिलेलं खूप वाईट वाईट होतं. ते पत्र उर्दूमध्ये होतं. आणि खाली काय कुणाचा पत्ता नाही, नाव नाही, गाव नाही, आणि चक्क लिहिलेलं होतं 'ये आदमी ने बहुत गुन्हा किया है।अल्ला के खिलाफ काम किया है. मजहब के खिलाफ काम कर रहा है।तो ये आदमी कभी भी इससे बच नही सकता।अल्ला करे ये मर जाय।अल्ला करे उसका बुरा हो जाय।' म्हणजे कर्सिंग होतं सगळं. किती वेळ मी ते पत्र वाचत होते. आणि मला तिटकारा सुद्धा आला, की माणूस जातानासुद्धा आपण त्याच्याबद्दल वाईट विचार करतो. म्हणजे किती क्रूरपणा आहे आपला ! लोकं एवढं तरी जाताना म्हणतात ना. 'बाबा बिचारा गेला. त्यानं काय केलं असेल आयुष्यात?' पण निदान असं तरी त्या वेळी वाईट बोलत नाहीत. कुणी तरी मुसलमानानंच ते पत्र लिहिलेलं असणार. कर्मठ मुसलमानानं, म्हणजे बघा तुम्ही पाच टाइम नमाज पढता. तुम्ही रोझे ठेवता, सगळं करता पण हे सगळं आपल्यापुरतंच असतं का मग? दुसऱ्याशी वागताना तुम्हांला लक्षात नाही राहात?
 आणि यांची काय परिस्थिती होती? ते पत्र वाचून त्यांना काय झालं असेल?
 ते पत्र मी बऱ्याच लोकांना दाखवलं. ते आता कुठं आहे, मला माहीत नाही. शोधावं लागेल. पण ते कुणी पाठवलं कळलं नाही... ते कळणार पण नाही.

 दलवाई आजारी असताना, ऑपरेशनच्या अगोदर, पैशाची गरज आहे असं जे चाललं होतं त्या काळामध्ये त्यांना कुलकर्णींच्या फाय फौंडेशनचं पंधरा हजाराचं बक्षीस मिळालं. पेपरमध्ये डिक्लेअर झालं. ह्यांना बातमी कळली. फंक्शन होणार होतं मुंबईला. पण हे जाऊ शकले नाहीत. तेव्हा शहासाहेब म्हणाले, 'आपण असं करू या, भाभी जाऊन घेऊन येतील. भाभी, तुम्ही जा आणि घेऊन या.' तर मी म्हटलं, 'नाही, शहासाहेब तुम्ही जा नं.' ते म्हणाले, 'तुमच्या जाण्यात आणि माझ्या जाण्यात फार फरक आहे.' मग त्यांनी मला नेलं आणि स्टेजवर जाऊन मी

मी भरून पावले आहे : १२१