पान:मी भरून पावले आहे.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभ्या पडायची. इतका डोक्यावर परिणाम झालेला होता. आणि मग जसलोकमध्ये नेलं मी तिला. डॉ. कामतनी तपासलं तिला. पैसे घेतले नाहीत त्यांनी. स्क्रीनिंग वगैरे सगळं करून घेतलं. ते म्हणाले, 'नाही, बाबांच्याकडे ही असायची ना, ते सगळं बघून हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. तसं काही नाहीये. हिला तुम्ही कॉलेजमध्ये घाला. लग्न करून द्या हिचं. लग्न झालं की ही बरी होईल.' अशी चेष्टाही त्यांनी केली. म्हणाले, 'काहीही या मुलीला रोग नाहीये. पण बाबांच्या दुखण्याचा परिणाम आहे म्हणून थोडे दिवस हे होणार.'
 आणखी एक गोष्ट. त्यांना ऑपरेशनला पोचवताना मी लिफ्टमध्ये सोडलं . त्यांना आणि मी येऊन अशी बसले. तेवढ्यात माझा फोन आलाय म्हणून कुणी तरी सांगितलं. मी फोन बाहेर येऊन घेतला. माझ्या आतेबहिणीचा, इशरतचा फोन होता. तिनं सांगितलं का अशी अशी तार आलेली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तुझे वडील गेले. पाकिस्तानमध्ये. बरं, माझे वडील ७० वर्षांचे होते. पण आमच्याकडे ९० नि १०० च्या खाली कोणी मेलंच नाही. वडील आमचे इतक्या लवकर गेले, का, तर त्यांच्या मनात नसताना ते कराचीला गेले होते. एकटे पडल्यामुळे त्यांना तिथं त्रास झाला. मला धस्स झालं, की बापरे, आज ही बातमी आली. आपण बघा कैक गोष्टी मानत नाही आणि मी तर त्याच्यातील अजिबात नाही. तरी पटकन माझ्या मनात असा विचार आला की एक राहायचा होता म्हणून दुसरा गेला.

१२० : मी भरून पावले आहे