पान:मी भरून पावले आहे.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हो. तुम्ही त्यांना ओळखलं सुद्धा नाही.' ते म्हणाले, 'नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं. का मला असं क्षणभर झालं?' पण वहिनी खूप समजूतदार होती. तशी लहान होती. वयानं खूप लहान होती. पण खूपच समजूतदार होती. त्या वेळी ती म्हणाली, 'नाही हो, त्यांना बरं नसताना असा कसा मी त्यांच्यावर आरोप करीन की त्यांनी मला मुद्दाम ओळखलं नाही?'
 दारुवालाला हॉस्पिटलमध्ये थोडे दिवस ठेवलं नि मग डिस्चार्ज केलं प्रोसिजरप्रमाणे. तो कुठे गेला, कधी गेला काहीच कळलं नाही. कारण तो जाताना निरोप घेऊन गेला वगैरे असंही काही नाही. काही संबंधच नाही हो. त्या दोघांचे फोटो काढलेले माझ्याकडे आहेत. ऑपरेशन झाल्यानंतरचा फोटो काढलेला आहे. जेव्हा त्या रूममधून बाहेर पडले ना, ऑपरेशन थिएटरच्या, तर त्या दोन नर्सेस, वॉर्डबॉय जो होता त्यांना ह्यांनी ५०-५० रुपये दिले. घेत नव्हते ते. डोळे भरून आले त्या नर्सेसचे. हे म्हणाले “नाही, मी बरा झालो ना, या खुषीनं तुम्हांला देतोय." आणि मला म्हणाले, "त्या नर्सेसनी माझी इतकी सेवा चांगली केली. असं कोणी करणार नाही. मी खुषीनं त्यांना दिले." कधीही हे दिसले की ते स्टाफचे सगळे लोक धावत यायचे, बोलायचे त्यांच्याशी. सगळ्या नर्सेस खूष असायच्या त्यांच्यावर. का तर चेष्टा-मस्करी चालूच असायची त्यांची. बोलणं-बिलणं म्हणजे जोक तर चालूच असायचे. विनोदी स्वभावच ना. त्यामुळे कुणाशी काय बोलायचं ते त्यांना बरोबर माहिती होतं.
 हे डायलिसिसवर असताना यांच्या दोन बहिणी आयेषा आणि भाना भेटायला आल्या. भाना म्हणजे मोठीचं नाव आबीद. तिला आम्ही भाना म्हणायचो. मोठी म्हणजे यांच्यापेक्षा लहानच. तर त्या भेटायल्या आल्या. त्या वर चढल्या आणि मी खाली उतरले. तेव्हा रुबीना होती ह्यांच्याजवळ. मला भेटल्या तेव्हा म्हणाल्या, 'कशीये दादाची तब्येत?' म्हटलं, 'तुम्हीच बघा, जा वर. मी जरा घरी जाऊन येते. तुम्ही जरा बसा.' त्या आल्या-बिल्या. त्यांचं काय बोलणं झालं, मला काही माहिती नाही. त्या निघून गेल्या. मी संध्याकाळी आले, तेव्हा मी रुबीनाला म्हणाले, 'आयेषा, भाना आल्या होत्या ना ग?' तर 'हो' म्हणाली. विचारलं, 'काय झालं?' 'त्या आल्यानंतर मी बाहेर निघून गेले. मी काही थांबले नाही. का तर त्यांच्या मनात काही बोलायचं असेल आणि मी समोर असले तर त्यांना मोकळेपणानं बोलता येणार नाही. म्हणून मी समोर थांबलेच नाही', असं रुबीना म्हणाली. हे झाल्यानंतर मी ह्यांना विचारलं, 'काय! स्वारी आज खुषीत आहे.