पान:मी भरून पावले आहे.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


असायचं का नेहमी आले ना की दलवाईंच्या कानामध्ये काही तरी बोलायचे. त्यांना ती सवयच होती. कधी त्या रूममध्ये घुसायचे, पत्ता लागायचा नाही. 'दादा, काय हे?' असं मी म्हणायची. तर म्हणायचे, 'काय बोलतेस बाई. काही बोलू नकोस. जरा मला बोलू दे ना त्याच्याशी.' 'नाही हो दादा, असं करू नका. अलाऊड नाही.' 'बरं, तू सांग, मी हे लावू? मी मास्क लावतो. तू जे सांगशील ते मी करेन. पण हमीदच्या जवळ जायला मला परवानगी दे. त्याच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही.' अन् तसे ते मास्क लावून बोलायचे. सकाळी जायच्या अगोदर पवारसाहेब खोलीमध्ये यायचे. म्हणायचे, 'काय म्हणतो पेशंट?' मी म्हणायची, 'बघा, तुम्हीच आत येऊन काय म्हणतोय तो.' मग आत यायचे. त्यांच्याबरोबर बोलायचे. मी पण असायची. दोघं बोलणार राजकारणावर. त्यांना सल्ला द्यायचा. 'शरदराव, हे बरोबर नाही. शरदराव ते बरोबर नाही.' दलवाई सांगणार त्यांना. शरदराव लहानच होते वयानं. दलवाई मोठेच होते. आणि ते मान पण द्यायचे ह्यांना. दोघांच्या राजकारणाच्या गोष्टी व्हायच्या. आणि ते निघून जायचे. त्याच्यानंतर जी माणसं पवारांकडे यायची ती सगळी ह्यांच्याशी आत जाऊन बोलायची नि जायची. संध्याकाळी पवार परत आले की पहिल्यांदा ह्यांच्या रूममध्ये यायचे. त्यांच्याशी बोलायचे नि मग आपल्या खोलीत जायचे नि आपल्या बायकोला विचारायचे, काय चाललेलं आहे? त्यांचं बारीक लक्ष असायचं. ते माझ्याशी काही फार मोकळेपणाने बोलायचे नाहीत. पण बायकोला बोलायचे, 'आज त्या काकींचा चेहरा काही बरोबर दिसला नाही.' त्यांची मुलगी मला काकी नि ह्यांना काका म्हणायची. सगळ्या घरातले लोक आम्हांला काका-काकीच म्हणायचे. तर 'काकींचा चेहरा काही आज मला बरोबर दिसलेला नाही. काही तरी त्रास होत असेल. जाऊन विचार', ते बायकोला म्हणायचे. मग ती येऊन विचारायची, 'काय हो काकी, काय झालं?' 'अहो तुम्हांला कोणी सांगितलं?' 'अहो, साहेब बोलत होते. तुम्हांला त्यांनी विचारायचं की नाही? काकी, मोकळ्या मनाने सांगत जा हां! आम्ही तुम्हांला इथं आणलेलं आहे. आणि आम्हांला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत तुमच्यासाठी.' त्यांच्या गार्डनमध्ये त्या बाईंनी भाज्या लावल्या होत्या. कोबी, फ्लॉवर, वांगी अशा बघण्यासारख्या भाज्या हिरव्यागार. नवरा-बायको रोज सकाळी जायची, ताटभर भाज्या भरायची. आणि पहिल्यांदा ताट माझ्या घरी घेऊन यायची. दलवाईंना सगळ्या भाज्या खायची परवानगी होती. मिठाशिवाय सगळं खायला परवानगी होती. तसा काही प्रश्न

११६: मी भरून पावले आहे